शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार – आदित्य ठाकरे
पुणे: आज गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक आहे. मी आज राजकारणावर काही बोलणार नाही. पण महाराष्ट्रातील आजचे राजकारण खूप वाईट आहे. ते राज्यासाठी , विकासासाठी नक्कीच चांगले नाही. लोकांना राजकारणाचा कंटाळा येईल इतके आजचे वाईट राजकारण होत आहे. राजकारण खालच्या पातळीवर आले आहे. दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होणार अशी माहिती माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
पुण्यात मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी आदित्य ठाकरे पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आदित्य ठाकरे म्हणाले,दोन वर्ष कोविडचे निर्बंध होते.म्हणूनच आपण आज सण साजरे करू शकतो. जर निर्बंध नसते तर उत्तर प्रदेशात जे घडले तेच इकडे घडले असते.
लोकांचा जीव महत्त्वाचा आहे.असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.
पुण्यातील गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये ते सहभागी झाले, त्यावेळी त्यांनी पुण्यातील गणेशोत्सव अनुभवला. आतापर्यंत टीव्हीवर पाहत होतो. यावेळी प्रत्यक्ष उत्साह पाहायला मिळाला.असे ते म्हणाले.
कोविडचा काळ होता. संपूर्ण जगासाठी कठीण काळ होता. सगळीकडे निर्बंध होते. जीव वाचवणे याला प्राथमिकता होती. तेच महत्त्वाचे होते. आज कोविड मागे पडला आहे, त्यामुळे आपले सर्वच सण उत्साहात साजरे होत आहेत. पुण्यातील मिरवणुका तर खूप मोठ्या असतात. याच मिरवणुका पाहायला आज आलो आहे. आनंद आहे. उत्साहाचे वातावरण आहे. असे आदित्य ठाकरे म्हणाले.
महापालिकांवर प्रशासक आहे. त्यामुळे महापालिका निवडणूका या लांबणीवर गेल्या आहेत. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले,
निवडणुका होणे गरजेचे आहे. वेगवेगळे प्रश्न उद्भवत असतात. मंत्र्यांना बंगले मिळाले आहेत, मात्र पदभार अद्याप घेतला गेला नाही. पालकमंत्रीदेखील अजून कुठलेही घोषित झालेले नाहीत. पालकमंत्री हे पद अत्यंत महत्त्वाचे असते, जिल्ह्यासाठी गरजेचे असते. त्यामुळे ते घोषित व्हावे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी या निमित्ताने केली आहे.
