अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले बाप्पाचे दर्शन
पुणे: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर असून त्यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचा महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन स्वागत सन्मान करण्यात आला. गणेशोत्सव काळात मुख्यमंत्र्यांनी अगदी पहाटे ४ वाजेपर्यंत कार्यकर्त्यांच्या घरोघरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले आहे. तर, अनेक दिग्गजांच्याही घरी भेटी दिल्या आहेत. त्यातच, आज पुणे दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री अभिनेता नाना पाटेकर यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले.
एकनाथ शिंदे यांनी नाना पाटेकर यांच्या पुणे जिल्ह्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील घराला भेट दिली. यावेळी पाटेकर यांच्या घरी स्थापना करण्यात आलेल्या श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि खासदार श्रीरंग बारणे आणि पाटेकर कुटूंबातील सर्व प्रमुख सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला नाना बाहेरच उभे होते.
