Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

बालेखान बंधूंच्या स्वरमयी सतार जुगलबंदीने “मोगरा फुलवला”….

पुणे :कधी गायन वादनाच्या तर कधी फक्त वादनाच्या तर कधी गायनाच्या जुगलबंदीचा अनुभव रसिकांनी अनेकदा घेतला आहे. पण जे वादक आहेत त्यांनीच गायन केले असे अपवाद फार कमी बघायला मिळतात. कर्नाटकच्या धारवाडमधील उस्ताद रईस आणि उस्ताद हफिज या बालेखान बंधूंनी सतारीवर तारा छेडत रसिकांना मंत्रमुग्ध केले. शेवटी अभंग सादर करून सतारीची जुगलबंदी स्वरमयी करत त्यात मोगरा फुलवला.

३४ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये किरणा घऱण्याचे उस्ताद रईस बालेखान आणि उस्ताद हफिज बालेखान यांच्या सतार अन गायनाच्या जुगलबंदीने पुणेकर रसिकांना जिंकले. बालगंधर्व रंगमंदीरात झालेल्या या जुगलबंदीच्या कार्यक्रमाच्या सुरूवातीला पुणे फेस्टिव्हलच्या मीरा कलमाडी आणि मालती कलमाडी यांनी अनुक्रमे रईस आणि हफिज यांचा तसेच त्यांना तबल्यावर साथसंगत करणा-या पांडुरंग पवार यांचा सन्मान केला. पुणे पोलिस वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे आणि महानगरपालिकेच्या झोन २ चे उपायुक्त नितीन उदास या अधिका-यांनाही सन्मानीत करण्यात आले. पुणे फेस्टिव्हलचे सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मोहन टिल्लू, श्रीकांत कांबळे. यावेळी उपस्थित होते. यानंतर रूपाली सुभाष पाटील हिने कलाकारांचा परिचय करून दिल्यावर कार्यक्रमाची सुरूवात झाली.

कलाकारांच्या परिचयातून बालेखान बंधू हे किराणा घराण्याचे कलाकार असून अब्दुल करीम खाँ साहेबांचे नातू असल्याची माहिती रसिकांपर्यंत पोचली होती. तसेच दोघेही शास्त्रीय सतार वादन करत असले तरी दोघांच्या प्रतिभा वेगळ्या असल्याचेही समजले. उस्ताद रईस यांनी वाद्यसंगीतात पदव्योत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेला असून त्यांना गाण्याचे शब्द सतारीच्या तारातून काढायला आवडते. या उलट उस्ताद हफिज हे शास्त्रीय सतार वादन पसंत करतात. अशा त्यांच्या परिचयामुळे ते काय वाजवणार याची उत्कंठा रसिकांना होती.

राग यमनपासून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर आलाप, जोर त्रिताल बंदीश असे एक से बढकर एक प्रकार सादर केले. यमन रागाच्या समाप्तीनंतर, पहाडी राग सादर केल्यावर मराठी व कानडी भजन सादर करणार असल्याचे सांगितले. सतारींचे सूर जमवल्यावर त्यांना चक्क ‘फुले वेचिता बहरू कळियासी आला मोगरा फुलला…’ हा संत ज्ञानेश्वरांचा अभंग सतारीवर वादनबरोबर गायलाही सुरूवात करून रसिकांना आश्चर्याचा धक्का दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading