Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

राहुल शिवकुमार शर्मांच्या संतूर वादनाच्या स्वतंत्र प्रतिभेची झलक ….

पुणे : मोठ्या झाडाच्या सावलीत लहान झाड बहरत नाही…….ही उक्ती किंवा म्हण आज पंडित राहुल शिवकुमार शर्मा यांनी आपल्या संतूर वादनाच्या सादरीकरणातून चुकीची ठरवली. कार्यक्रमातही अनेक वेळ योग्य ठिकाणी त्यांना टाळ्याचा प्रतिसाद रसिक देत होते. एक कलाकार, शास्त्रीय संतूरवादक, संगीतकार अशी आपल्या स्वतंत्र प्रतिभेची झलक पुणेकर रसिकांना दाखवली. कार्यक्रम संपल्यावर पुणेकरांना चक्क उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना दाद दिली.

३४ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये राहुल शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनाने रसिकांना भुरळ घातली. बालगंधर्व रंगमंदीरात झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरूवातीला पुणे फेस्टिव्हलच्यावतीने मीरा कलमाडी यांनी राहुल शिवकुमार शर्मा यांचा सन्मान केला. तसेच त्यांना तबल्यावर साथसंगत करणा-या मुकुंदराज देव यांचा सन्मान फेस्टिव्हलचे मुख्यसंयोजक डॉ. सतीश देसाई यांनी केला. पंडित उपेंद्र भट, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मोहन टिल्लू, श्रीकांत कांबळे यावेळी उपस्थित होते. पहाडी धून सादर करत असतानाच पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांचे आगमन झाले. कलमाडी यांनी रंगमंचावर जाऊन राहुल शिवकुमार शर्मा यांची भेट घेतली. पं. शिवकुमार शर्मा यांच्या आठवणी

राहुल शिवकुमार शर्मा हे वाणिज्य शाखेचे पदवीधर असून ते त्यांच्या वयाच्या २४ व्या वर्षापासून स्व. पंडित शिवकुमार शर्मा यांची संतूर वादनात साथसंगत केली आहे. यंदाच्या वर्षी पं. शिवकुमार शर्मा यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी सोलो संतूर वादनाचा कार्यक्रम पुणे फेस्टिव्हलमध्ये सादर केला. त्यामुळे त्यांच्या सोलो कार्यक्रमाबद्दल रसिकांना एक वेगळीच उत्सुकता होती. वेळोवेळी मिळालेल्या टाळ्यांमुळे रसिकांची अपेक्षापूर्ती होत असल्याची ती पावती होती.

कलावती रागात त्यांनी आलाप, झोड, झाला, जयताल करत शेवटी द्रूत वादन केले. शेवटी त्यांनी पहाडी धून सादर करणार असल्याचे सांगितले. प्रथम त्यांनी फ्यूजन पद्धतीचे पहाडी धून सादर केली. नंतर पारंपारिक पहाडी धून सादर करत मैफलीची सांगता केली. पहाडी धून सादर होत असताना तबलावादक मुकुंदराज देव यांनी चाळ, थाळी व अन्य तालवाद्यांनी त्यात रंग भरले. शेवटी संतूर व तबला वादन थांबल्यावर रसिकांनी हात उंचावत टाळ्यांचा कडकडाटाने रंगमंदिर भारून टाकले. संतूर वादनात अनेकदा पं. शिवकुमारजींच्या वादनाचाही भास होत होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading