शिवसंग्राम संघटना राज्यस्तरीय बैठक – डॉ.ज्योती मेटे यांनी अध्यक्षपद स्वीकारावे असा ठराव मंजूर
पुणे: शिवसंग्रामचे संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे निधन झाल्यानंतर संघटनेच्या राज्यस्तरीय बैठक आज पुण्यात पार पडली. बैठकीला स्व.मेटेसाहेबांच्या पत्नी डॉ.ज्योती मेटे आवर्जून उपस्थित होत्या. शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांच्यासह राज्यभरातील सर्व जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. स्व.मेटेसाहेबांच्या अपघाती मृत्यूनंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांत जी दुःखाची व काहीशी नैराश्याची भावना निर्माण झाली त्यासाठी डॉ.ज्योती मेटे यांनी रिक्त झालेले राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावे हा पहिला ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला.
दुसरा ठराव – महायुतीतील मित्रपक्ष म्हणून भाजपने स्व.मेटे यांना विधानपरिषदे सह मंत्रीपद देण्याचा शब्द दिला होता. आता त्याचे पालन करत डॉ.ज्योती मेटे यांना विधानपरिषद व मंत्रीपद मिळणे हा आमचा हक्क देऊन भाजपने वचनपूर्ती करावी ! हा ठरावही एकमुखाने पारित करण्यात आला.
तिसरा ठराव- स्व.मेटे साहेबांनी मराठा आरक्षण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक आदी. बाबींसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले ! त्यांच्या माघारी हतबल न होता डॉ.ज्योती मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली दुप्पट जोमाने वरील विषय सोडविण्यासाठी शिवसंग्रामचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता कटिबद्ध असेल. हा ठरावही गांभीर्याने व एकमताने मंजूर करण्यात आला.
या राज्यभर दौरा करून पुन्हा चैतन्य निर्माण करण्यासाठी मेळावे घेणार असल्याचा महत्वाचा निर्णय आज घेण्यात आला.
स्व.मेटेसाहेबांनी आयुष्यभर मराठा आरक्षण व या समाजाच्या इतर समस्या, मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक तसेच शेतकरी पेन्शन योजना आदींसाठी संघर्ष केला. तो लढा संपूर्ण ताकदीने लढायचा निर्धार सगळ्यांनी व्यक्त केला.
वरील संघर्षाला बळ मिळावे यासाठी, स्व.मेटे यांना भारतीय जनता पक्षाने शब्द दिला होता आता डॉ.ज्योती मेटे यांना विधानपरिषद व मंत्रीपद दिलेच पाहिजे असा ठराव पारित करण्यात आला. विधानपरिषद व मंत्रीपद हा मित्रपक्ष या नात्याने आमचा हक्क असल्याची ठाम भूमिका अनेकांनी मांडली.
शेवटी मनोगत व्यक्त करताना डॉ.ज्योती मेटे म्हणाल्या की स्व.साहेब हे स्वतःच्या कुटुंबाप्रमाणेच शिवसंग्रामला आपले कुटुंबच मानत होते. त्यांच्या दुर्दैवी मृत्यू नंतर, त्यांची उत्तराधिकारी म्हणून कुटुंबप्रमुख ही जबाबदारी माझ्यावर आलेली आहे व मी या शिवसंग्रामचा माझ्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही. राज्यातील सर्वच कार्यकर्त्यांच्या बळावर मी स्व.मेटे साहेबांचे अधुरी राहिलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू !
डॉ.ज्योती मेटे यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावे तसेच विधान परिषदेचे सदस्यपद व मंत्रीपद काम करावे या सर्व कार्यकर्त्यांच्या विनंतीला त्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. काही कायदेशीर बाबींमुळे लवकरात लवकर त्या त्यांचा होकार कळवणार आहेत.
वरील बैठकीसाठी शिवसंग्राम गुजरातचे प्रदेशाध्यक्ष मनीष पगार, राज्याचे सरचिटणीस विक्रांत आंब्रे, उपाध्यक्ष संदीप पाटील, राजन घाग, युवकाध्यक्ष उदय आहेर धुळे जि.प.सदस्य ज्ञानेश्वर भामरे बीडचे अप्पा कोलंगडे प्रदेश सचिव शेखर पवार प्रवक्ते प्रफुल्ल पवार आदींसह राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख हजर होते.
बैठकीचे आयोजन स्थानिक पदाधिकारी भरत लगड, केतन महामुनी, कालिंदि गोडांबे, सचिन दरेकर, लहू ओहोळ, समीर निकम, विनोद शिंदे, संगीता घुले, चेतन भालेकर, कल्याणराव अडागळे आदींनी केले.
