Pune Festival – गुलाल…..अबीर उधळत रंगली राहुल देशपांडेची संगीत मैफल
पुणे : गुलाल हा गणपतीला प्रिय तर विठ्ठलाला पांडुरंगाला अबीर…..गणेशापासून सुरू झालेली सूरांची मैफल अखेर कानडा राजा विठ्ठलापर्यंत येऊन थांबली. निमित्त होते राहुल देशपांडे यांच्या संगीत मैफलीचे. ३४ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये सोमवारची रात्री तरूण गायक राहुल देशपांडे यांची गायनाची मैफल झाली. स्व. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या बंदिशीने सुरू झालेल्या मैफलीची सांगता “कानडा राजा पंढरीचा’’ या भैरवीने झाली.
यंदाचा पुणे फेस्टिव्हल २०२२ अवॉर्ड राहुल देशपांडे यांना देण्यात आला आहे. फेस्टिव्हलच्या उदघाटन सोहळ्याच्या दिवशी ते परदेशात असल्याने अवॉर्ड त्यांना देता आला नव्हता. आजच्या संगीत मैफलीच्या मध्यतंरात पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि मीरा कलमाडी यांनी “पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड 2022” देऊन राहुल देशपांडे यांचा सन्मान केला. या मैफिलीत साथसंगत करून रंग भरणा-या कलाकारांना स्मृती चिन्हं देऊन मिरजचे भाऊसाहेब पटवर्धन आणि गायत्रीदेवी पटवर्धन यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्यसंयोजक डॉ. सतीश देसाई रंगमंचावर उपस्थित होते. काका धर्मावत यांनी सूत्रसंचलन करताना राहुल देशपांड़े व त्यांच्या साथीदारांचा परिचय करून दिला.
या मैफलीत राहुल देशपांडे यांना निखिल फाटक आणि प्रसाद जोशी यांनी तबला, मिलिंद कुलकर्णी हर्मोनियम, रोहन वनगे ऑक्टोपॅड, अमृता ठाकूरदेसाई कीबोर्ड आणि हृषिकेश पाटील – संपदा कुलकर्णी यांनी तानपु-यावर साथसंगत केली.
कार्यक्रमाचा आरंभ राहुल देशपांडे यांनी आपले आजोबा डॉ वसंतराव देशपांडे यांनी जोगकंस रागात बांधलेल्या “गुलाल…अबीर उडाया” या बंदिशीने केली. हे सांगताना आजोबांनी खूपच काम केले आहे ते पुढे नेण्याचा मी प्रय़त्न करतोय असे त्याने नम्रपणे सांगितले अन रसिकांची पहिली टाळी मिळवली “सिर पे शेरा बंधायो” ही बंदिश सादर केली. त्यानंतर राहुल देशपांडे हे आबुधाबीत कार्यक्रमानिमित्त गेले होते. तेथे तयार होत असलेल्या पहिल्या हिंदू मंदिराला भेट देऊन मंदिरासाठी वीट दिली याचा अनुभव कथन केला.
आपण आजून दोन बंदिशी गाणार असल्याचे सांगत राहुल देशापांडे यांनी पुणे फेस्टिव्हलचाही अनुभव सांगितला. ते म्हणाले, पुणे फेस्टिव्हल सुरू झाला तेव्हा मी शाळेत होतो. फेस्टिव्हलमध्ये भरवण्यात आलेल्या शिल्पकला स्पर्धेत मी भाग घेतला होता अन त्यावेळी पूर्वी कधीही न केलेला मातीची गणपतीची मूर्ती तयार केली होती. या माझ्या कलाकृतीला १४ वे बक्षिस म्हणून १०० रूपयांचे पारितोषिक मिळाले होते. त्यानंतर आज पहिल्यांदा या रंगमंचावर गायनाची संधी दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात याला दाद दिली. टाळ्यांचा कडकडाट थांबण्यापूर्वीच त्यांनी हे लाल….. ही पुढची बंदिश सुरू केली पूर्वरंगाची सांगता त्यांनी डॉ. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेल्या “साव रे आय जै यो….” बंदिशीने केली. पूर्वरंगाचा सांगता करताना त्यांनी रसिकांनी फर्मायशी द्याव्यात असे आव्हान केले.
उत्तररंगासाठी रंगमंचावर रसिकांच्या फर्माईशींचा गठ्ठा घेऊनच राहुल देशपांडे यांनी स्वरमंचावर पदार्पण केले. अष्टविनायक चित्रपटातील ‘प्रथम तुला वंदितो कृपाळा …’ या गाण्यातून श्री गणेशाला वंदन करून केली. त्यानतंर आपण कट्यार काळजात घुसली या नाटकातील पद सादर करणार असल्याचे सांगताच रसिकांनी टाळ्या वाजवल्या पण आपण घेई छंद मकरंद सादर करणार नसल्याचे सांगत ‘तेजो निधी लोह गोल…’ सादर केले. त्यानंतर मात्र रसिकांची फर्माईश असल्याने ‘घेई छंद मकरंद…’ हे पद सादर करून रसिकांना खूष केले.
कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील ‘दिल कि तपिश आज है आफताब…’ हे त्यांनीच म्हटलेले गाणे सादर केले. त्यानंतर बगळ्यांची माळ फुले हे गाणे सादर केले. मैफलीची सांगता ‘कानडा राजा पंढरीचा…’ या प्रसिद्ध भैरविने केली. अभंगाच्या शेवटी विठ्ठलाचा नामगरज त्यांनी वेगवेगळ्या ढंगात करताना रसिकांनाही त्यावर विठ्ठल….विठ्ठल असा ठेका धरायला भाग पाडले.
