Pune Festival – उस्ताद सुजाद खान यांच्या सितार वादनाने रसिक मंत्रमुग्ध
पुणे : ३४व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सितार वादक उस्ताद सुजाद खान यांच्या सितार वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
३४ व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत उस्ताद सुजाद खान यांच्या सितार वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांना प्रसिद्ध तबला वादक मुकेश जाधव यांनी तबल्याची साथ दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि त्यांच्या पत्नी मीरा कलमाडी यांच्या हस्ते उस्ताद सुजाद खान मुकेश जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे फेस्टिव्हलचे मोहन टिल्लू, अतुल गोंजारी हे उपस्थित होते.
उस्ताद सुजाद खान यांनी राग शुद्ध कल्याण मधील ‘ बाजो रे.. बाजो रे .. ही पारंपारिक बंदिश सादर केली. त्यानंतर त्यांनी विलंबित तीन ताल, द्रुत तीन तालातील वेगवेगळ्या ताणा, सरगम आणि सतारीचे सर्व वैशिष्ट्ये पेश केले.
त्यांच्या मधुर वाणीतून त्यांनी अमीर खुस्त्रो यांचे वचन गायले. उस्ताद सुजाद खान आणि मुकेश जाधव यांच्या सितार आणि तबला वादनाच्या जुगलबंदीने रसिकांना चिंब केले.
