‘किराणा घराणा ग्रंथालय व संसाधन केंद्र’ उद्घाटन येत्या १३ सप्टेंबरला
यंदाचा ‘संगीत कला विहार’ या मासिकाचा ‘स्वरयोगिनी’ हा विशेषांक पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना समर्पित; डॉ विकास कशाळकर यांच्या उपस्थितीत होणार गौरवार्पण
पुणे, दि. ६ सप्टेंबर : किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे या येत्या १३ सप्टेंबर रोजी वयाच्या ९१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. या निमित्ताने स्वरमयी गुरुकुल, शिवाजी नगर येथे स्थापन करण्यात येत असलेल्या ‘किराणा घराणा ग्रंथालय व संसाधन केंद्रा’चे औपचारिक उद्घाटन देखील करण्यात येणार आहे.
या उद्घाटन समारंभास अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष डॉ विकास कशाळकर, उपाध्यक्ष पं. पांडुरंग मुखडे, संगीत कला विहार मासिकाचे संपादक सुधाकर चव्हाण, डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम.डी. व स्वरमयी गुरुकुलचे कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे उपस्थित राहणार आहेत.
सदर उद्घाटन समारंभात अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘संगीत कला विहार’ या मासिकाच्या ‘स्वरयोगिनी’ या विशेषांकाचे गौरवार्पण करण्यात येणार आहे.
डॉ. प्रभा अत्रे यांची दीर्घ सांगीतिक कारकीर्द व अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा यथोचित सन्मान करण्याच्या द्र्ष्टीने यंदाचा ‘संगीत कला विहार’ या मासिकाचा विशेषांक डॉ. प्रभा अत्रे यांना समर्पित करण्यात आला आहे.
