Saturday, September 12, 2026
Latest NewsPUNE

माजी अपंग सैनिकांनी केला ‘बाप्पा मोरया ‘चा जागर.

पुणे – युध्दभूमीवर शत्रूंबरोबर लढताना आपल्या प्राणाची पर्वा न करता मातृभूमीचे रक्षण करताना दुर्दैवाने या शूरवीरांना कायमचे अपंगत्व आले पण तूसभरही शौर्य, जिद्द  कमी न होता आपल्या देशाबद्दल तीच राष्ट्रभक्ती तेवत ठेवत हे  ‘जवान ‘ आज आपलं आयुष्य जगत आहेत. खडकी येथील पँराप्लेजिक रिहँबिलेटशन सेंटर PRC अर्थात माजी अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रात या सैनिकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात, त्यांच्यातील एकाकीपण दूर व्हावे, सकारात्मकता वाढावी या ऊद्देषाने कोरोना नंतर पहिल्यादांच यंदाच्या गणेशोत्सवात  ‘उत्सव रंगे…बाप्पा संगे ‘ या उपक्रमाचे आयोजन रंगकर्मी चोरडिया फाउंडेशन आणि आयली’ज डान्स अँड आर्ट अँकँडमीच्या वतीने करण्यात आले होते.
चौसष्ठ  कलांचा अधिपती , चैतन्याचा महासागररूपी बाप्पा अर्थात श्री गणेश.सृष्टीतील चराचरांत ज्याच्या मुळे उत्साह संचारतो अश्या विघ्नहर्ताच्या गुणगानाने या मैफिलीचा आरंभ झाला. सावनी सहस्त्रबुद्धे हिच्या कथ्थक नृत्याने वातावरण  भक्तीमय होऊन गेले . गायक हिम्मतकुमार पंड्या, राजेश शिंगाडे ,गायिका गितांजली जेधे यांनी आपल्या स्वराभिषेकाने या  विशेष रसिकांना वेगळीच अनुभूती दिली. अभिनेत्री आयली घिया हिने लोककला आणि भारतीय नृत्यावर जबरदस्त  सादरीकरण केले . सुप्रसिद्ध अभिनेते  संतोष चोरडिया आणि अभिनेत्री डाँ . कविता घिया यांची संकल्पना ,लेखन असणाऱ्या या कार्यक्रमात त्यांनी गणेशोत्सव,त्याची महती आणि सैनिकांचे बलिदान आदी विविध विषयांना स्पर्श करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कीबोर्ड वर अमन , सुबोध चांदवडकर ,ड्रम मशीन विजय भोंडे, ढोलक विशाल अडसूळ या वादकांनी मोलाची साथसंगत केली.
याप्रसंगी PRC चे प्रमुख कर्नल डाँ .आर.के.मुखर्जी म्हणाले , ” ज्या सैनिकांनी देशासाठी लढताना आपलं सर्वस्व गमावलं त्यांच्यासाठी इथे येऊन त्यांना सकारात्मकता देण्याचे, जगण्याचे बळ देण्याचे महान कार्य कलेच्या माध्यमातून  संतोष  चोरडिया आणि त्यांची टीम करीत आहेत .हिच ईश्वराची प्रार्थना, सेवा आहे.
तसेच तीन युध्दांमध्ये सहभागी झालेले ८६ वर्षीय माजी नायब सुभेदार भूपाल सिंग म्हणाले ” या देशासाठी आजही युध्दभूमीवर जाण्याची वेळ आली तरी आम्ही तयार आहोत. या कलाकारांनी आमच्या आयुष्यात  हा जो काही आनंद दिलाय त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.
याप्रसंगी रंगकर्मी चोरडियाचे विश्वस्त ओंकार चोरडिया , रंजना चोरडिया तर PRCचे लेफ्टनंट कर्नल बि.एल. भार्गव या केंद्राचे प्रमुख कर्नल डाँ. आर. के.मुखर्जी , माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading