आदिवासी समाजाच्या विकासासाठी शिक्षण, स्वाभिमान आणि स्वावलंबन महत्त्वाचे – भैय्याजी जोशी
पुणे : आदिवासी समाजाच्या विकासासाठी शिक्षण, जागरूकता आणि स्वावलंबन अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजाची प्रगती केवळ आर्थिक उन्नतीवरून मोजता येत नाही, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगता येणे आणि इतरांच्या बरोबरीने उभे राहता येणे, हे खऱ्या विकासाचे मापदंड आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले.
मुळशी तालुक्यातील माले गावात असलेल्या हुतात्मा नाग्या महादू कातकरी समाज विकास केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आदिवासी समाजाने शिक्षित, संघटित आणि जागरूक राहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. ते म्हणाले, “आपली सुरक्षा आपण सुनिश्चित केली, तरच आपला समाज आणि देश सुरक्षित राहू शकतो. शहरांपासून गावांपर्यंत आणि दुर्गम डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांपर्यंत प्रत्येकाने सतर्क राहून स्वतःच्या, समाजाच्या आणि राष्ट्राच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडली पाहिजे.”
या वेळी सुरेश गुरव, सुरेश कुलकर्णी, नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तालयाचे सहसंचालक दशरथ पानमंद, रोहन फेडरेशनचे सुहास लुंकड व वर्तिका भटेवरा, वनवासी कल्याण आश्रमाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य गिरीश कुबेर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सागर काटकर आदी मान्यवर उपस्थित होते. रोहन फेडरेशनतर्फे मुळशी तालुक्यातील कातकरी समाजाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या कार्यक्रमात मुळशी तालुक्यातील ३४ आदिवासी पाड्यांमधील ५८० कातकरी बांधवांना अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी, महिला आणि समाजातील अन्य गुणवंतांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात कातकरी समाजातील पहिले पीएचडीधारक डॉ. रवींद्र भुरकुंडे यांचा विशेष गौरव करण्यात आला. आधुनिक महाराष्ट्रातील कातकरी समाजाचा ऐतिहासिक अभ्यास या विषयावर संशोधन करून त्यांनी नुकतीच मुंबई विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली आहे.
भैय्याजी जोशी पुढे म्हणाले की, खरा विकास हा केवळ आर्थिक प्रगतीपुरता मर्यादित नसतो. समाजातील प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठा मिळणे, तिचा स्वाभिमान जपला जाणे आणि इतरांच्या बरोबरीने सन्मानाने जगण्याची संधी मिळणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. “चुकीच्या मार्गानेही पैसा कमावता येतो; मात्र सन्मान आणि प्रतिष्ठा योग्य मार्गानेच मिळवता येते. समाजाने संघटित, शिक्षित आणि जागरूक राहिले पाहिजे. शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे शाळा आणि शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी समाजाने प्रयत्न केले पाहिजेत. निसर्गाने उपलब्ध करून दिलेल्या नैसर्गिक संसाधनांवर आदिवासी समाजाचा पहिला हक्क असल्याचेही त्यांनी नमूद केले.
वनवासी कल्याण आश्रमाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य गिरीश कुबेर यांनी आदिवासी समाजाच्या शाश्वत विकासासाठी जमीन, जंगल आणि पारंपरिक हक्कांचे संरक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सुमारे दहा कोटी लोकसंख्या असलेल्या आदिवासी आणि वनवासी समाजाला जमिनीवरील मालकी हक्क मिळणे आणि त्यांचे पारंपरिक हक्क सुरक्षित राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “सेवेचा उद्देश केवळ मदत करण्यापुरता मर्यादित नसावा. या समाजाला स्वावलंबी बनवून स्वाभिमानाने आणि सन्मानाने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम करणे, हे सेवेचे खरे उद्दिष्ट असले पाहिजे,” असे कुबेर म्हणाले.
जनजाती कल्याण आश्रम, मुळशी; उपविभागीय अधिकारी कार्यालय, मावळ-मुळशी; तहसीलदार कार्यालय, मुळशी; एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव; मुळशी पंचायत समिती आणि पुण्यातील रोहन फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कातकरी समाजातील शेकडो बांधवांनी आपल्या कुटुंबीयांसह उपस्थिती लावली.
सागर काटकर यांनी प्रास्ताविक केले. वैशाली नामजोशी यांनी आभार मानले, तर राजेश मारणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
