‘उसवलेली नाती…कोरोनाने जगायला शिकवल….’
अखिल जनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
गोखलेनगर-जनवाडी परिसरातील अखिल जनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘उसवलेली नाती…कोरोनाने जगायला शिकवलं’ हा जीवंत देखावा सादर केला आहे. मंडळ या वर्षी हीरकमहोत्सव साजरा करीत आहे.
कोरोनाच्या संकटामुळे माणसा-माणसांतील नाती तुटली. प्रत्येकजण मी कसा जीवंत राहील याचाच विचार करत होता. नातेवाईक आणि शेजारीपाजारी कारणे सांगून दूर पळत होती. अशा वेळी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, महापालिका कर्मचारी, पोलिस आणि सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते स्वतःचा जीव धोक्यात घालून कुटुंबाची तमा न बाळगता मदतीसाठी धावून आले. या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा देखावा सादर केल्याची माहिती मंडळाचे प्रमुख मार्गदर्शकउमेश वाघ यांनी दिली.
परिसरात कोरोनाचा शिरकाव, निर्माण झालेले भीतिचे वातावरण, समाजातील विविध घटकांची अलिप्तता, कुटुंबापासून दूर राहावे लागलेल्या पोलिस अधिकारी आणि मुलाचा संवेदनशील संवाद, कर्तव्यतत्पर नर्स, अंत्यसंस्काराची निर्भीडपणे काम करणारे सर्वधर्मीय युवक आणि कोरोनाने तरुण मुलगा गमावलेल्या आईचे आर्त निवेदन असे प्रसंग सादर करण्यात आले आहेत. या देखाव्यात किलबिल शाळेतील अठरा विद्यार्थी कलाकारांनी सहभाग घेतला आहे.
कोरोना काळात परिसरातील नागरिकांना अन्नधान्याचे किट, वैद्यकीय मदत आणि समुपदेशन अशा प्रकारची मदत मंडळाने केली. महाड पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत केली. या वर्षी गणेशोत्सवासाठी वर्गणी जमा करीत असताना, अद्यापही कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीतून काही कुटुंब सावरली नसल्याची जाणीव कार्यकर्त्यांना झाली. अशा पन्नास कुटुंबियांकडून वर्गणी न घेता या कुटुंबांना मुकुल माधव संस्थेच्या सहकार्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले.
नरेश राजू कांबळे हे मंडळाचे अध्यक्ष असून विनोद सकट विवेक कांबळे अभिजीत धाडवे गणेश कांबळे अमर कांबळे राजू नगरकर संकेत बागडे अशोक खुडे मंगेश खराडे हे प्रमुख पदाधिकारी आहेत. मंगला पाटील आणि नयना वाघ यांनी जिवंत देखावा सादर करण्यास विशेष परिश्रम घेतले.
