तब्बल ९० लाखांहून अधिक गणेशक्तांनी ‘दगडूशेठ’ च्या श्रीं चे घेतले आॅनलाईन दर्शन
पुणे : केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील गणेशभक्तांचे आकर्षण असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन ट्रस्टच्या वेबसाईट, फेसबुक, यू ट्यूब, इन्स्टाग्राम, ट्विटरसह सोशल मीडियावर तब्बल ९० लाखांहून अधिक गणेशभक्तांनी घेतले आहे. ट्रस्टतर्फे सुरु झालेल्या उत्सव काळात व प्रत्यक्ष गणेशोत्सवाच्या काळात भारतासह परदेशातून लाखो गणेशभक्तांनी ट्रस्टतर्फे करण्यात आलेल्या आॅनलाईन सुविधांचा लाभ घेतला आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३० व्या वर्षीचा गणेशोत्सव सुरु आहे. आॅगस्ट महिन्यात ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रम सुरु झाले. तेव्हापासून ट्रस्टच्या वेबसाईटवरुन ३ लाख ५३ हजार ७८१ हून अधिक भाविक दर्शन घेत आहेत. वेबसाईटवरुन दररोज सकाळी व रात्री होणारी लाईव्ह आरती व दर्शन देखील १ लाख ६१ हजार ५७९ गणेशभक्तांनी घेतले आहे. तर, सुमारे ६७ लाख ७७ हजार भाविक फेसबुकवरुन, इन्स्टाग्रामवर १६ लाख ९ हजार यांसह यूटयूब व अॅप वरुन देखील गणेशभक्तांनी भेट दिली आहे. यामुळे यंदाच्या गणेशोत्सव काळात आजपर्यंत तब्बल ९० लाखांहून अधिक गणेशभक्तांनी आॅनलाईन दर्शनाचा लाभ घेतला आहे. डिजीटल माध्यमातून ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांना देखील भक्त जोडले गेले आहेत.
भारतातील मुंबई, नागपूर, पिंपरी-चिंचवड, अहमदाबाद, बंगळुरु, हैदराबाद, इंदोर, दिल्ली, भुवनेश्वर आदी शहरांमधून आॅनलाईन पद्धतीने बाप्पांचे दर्शन घेण्यात आले आहे. तसेच अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, युरोप, यु.ए.ई., आॅस्टेÑलिया, सिंगापूर, नेदरलँड आदी देशांतील भक्तांनी दगडूशेठ च्या श्रीं चे दर्शन घेण्यासाठी ट्रस्टच्या सोशल मीडियावर भेट दिली आहे.
उत्सवकाळात भारतासह परदेशातील गणेशभक्तांना घरच्या घरी श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_ iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth _ Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन सुविधांचा देखील लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
* तब्बल ९० लाखांहून अधिक भाविकांनी घेतले आॅनलाईन दर्शन
१) फेसबुक – ६७,७७,१६३
२) वेबसाईट – ५,१५,३६०
३) इन्स्टाग्राम – १६,०९,०९८
