कलेमध्ये समाजाची मानसिकता बदलण्याची ताकद – ज्येष्ठ चित्रकार रवी देव यांचे मत
पुणे : पुण्यातील शिक्षण संस्था शंभर वर्षांहून अधिक काळापासून कार्यरत आहेत. या संस्था फक्त शिक्षण देण्याचे नाही तर माणसे घडविण्याचे सुद्धा काम करतात. कलेने आपले जीवन समृद्ध केले आहे म्हणून जगण्यासाठी कला महत्वाची आहे. कोरोना काळात लोक घरात होते. यावेळेला त्यांची मानसिकता कलेमुळे चांगली राहिली. त्यावरून असे कळते की समाजाची मानसिकता बदलण्याची ताकद कलेमध्ये आहे, असे मत ज्येष्ठ चित्रकार व महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रवी देव यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, सेवा मित्र मंडळ व ठाकूर परिवाराच्या वतीने ज्येष्ठ शिक्षक व शाहीर कै.शशिकांत ठाकूर स्मरणार्थ लोकशिक्षक पुरस्कार २०२२ संपन्न झाला. यंदाचा पुरस्कार रांगोळीला विशेष दर्जा प्राप्त करुन देणारे उच्च विद्याविभुषित कलासक्त शिक्षक अक्षय शहापूरकर यांना रवी देव यांच्या हस्ते शुक्रवार पेठतील त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. यावेळी ढोलताशा महासंघ महाराष्ट्रचे अध्यक्ष पराग ठाकूर, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष सागर कुलकर्णी, सई शहापूरकर उपस्थित होते. यांसह पुरस्कार समिती मधील सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, उदय जगताप देखील उपस्थित होते. पुरस्काराचे हे १४ वे वर्ष आहे. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी शहापूरकर यांच्या दारात रांगोळी व दाराला तोरण बांधण्यात आले.
अक्षय शहापूरकर म्हणाले, कलेमध्ये खूप ताकद आहे, फक्त ती ओळखता आली पाहिजे. शिक्षण माणसाला कसे जगायचे ते शिकवते तर, कला माणसाला का जगायचे ते शिकवते. का जगायचे हे जेव्हा माणसाला कळते तेव्हा त्याच्या जीवनाचा नवा प्रवास सुरु होतो. आपण घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या कलेत करता येईल का याचा विचार करू ही कला जोपासण्याचे कार्य मी करीत आहे. रांगोळी या कलेला भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्व आहे आणि ही कला जोपासण्याचे भाग्य मला मिळाले आहे. रांगोळी ही कला हिंदू धर्म समृद्ध करणारी आहे, असे ही त्यांनी सांगितले.
