मुंबई स्पोर्ट्स’ : खेळाबाबतची जागरूकता निर्माण करण्यासाठीची चळवळ व पुढच्या पिढीच्या उत्कर्षासाठी एक मोठे व्यासपीठ !!!
मुंबई क्रीडाजगताच्या एकोप्याचे सामूहिक व्यासपीठ ‘मुंबई स्पोर्ट्स’तर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या सोहळ्याचे आयोजन पार्ल्यातील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात करण्यात आले. क्रीडा भीष्माचार्य श्री. मधुकर तळवलकर यांनी मुंबईतील सर्वोत्तम खेळाडूला दर वर्षी पुढील पाच वर्षे वैयक्तिक एक लाखाच्या रोख रकमेने गौरविण्यासाठीची घोषणा तसेच त्यांनी उपस्थितांना, क्रीडा कार्यकर्त्यांना फिट राहण्याचा दिलेला कानमंत्र – यामुळे मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनाच्या या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमास चार चांद लागले !
‘मैदान बचाव’ चळवळीस नव्या उत्साहाने जोड देत क्रीडा संस्कृती जपण्याचा ध्यास, तसेच मुंबईतील क्रीडापटूंचा जाहीर सत्कार करण्याचा पोयसर जिमखान्याचा पुढाकार, इत्यादी द्वारे एकूणच मुंबईतील क्रीडाजगताला प्रोत्साहन व शहरातील क्रीडाप्रेमीनां सातत्याने एकत्र आणण्याचा मनोदय करण्यात आला व सर्वसमावेशक अशा ‘मुंबई स्पोर्ट्स’ या शहरातील क्रीडा चळवळीची पाळेमुळे रुजविली गेली.
मुंबई स्पोर्ट्सच्या मागील वर्षाच्या कार्यक्रमात उत्साहाने सामिल झालेले मुंबई क्रीडाजगतातील अधर्व्यू दिवंगत मधुकर दरेकर यांची कमतरता सर्वांना जाणवली. महेंद्र चेंबूरकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली व तदनंतर कार्यक्रमाची सुरुवात करताना छत्रपती शिवाजी स्मारक न्यासाचे श्री. अरविंद प्रभू यांनी सर्वांचे स्वागत केले.
क्रीडामहर्षी मधुकर तळवळकर तसेच इंडिया तायक्वांडोचे अध्यक्ष, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे संयुक्त सचिव, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या खेळाडूंचा तसेच पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस ‘मुंबई स्पोर्ट्स’ चे प्रवर्तक जय कवळी यांनी ‘मुंबई स्पोर्ट्स’ चा आजपर्यंतचा प्रवास व सद्यस्थिती समुदायासमोर मांडली. पुढे जाऊन ‘मुंबई स्पोर्ट्स’ साठी ‘ट्रस्ट’ची संकल्पना आदिल सुमारीवाला यांच्या वतीने जय कवळी यांनी सादर केली व त्याला सर्वानुमते मंजुरीही घेण्यात आली.
जया शेट्टी यांनी ‘मुंबई स्पोर्ट्स’ चे पुढील मार्गक्रमण कसे असेल, याबाबतची माहिती आपल्या शब्दात मांडली.
‘मुंबई स्पोर्ट्स’ला १,००,००१ /= रुपयांचा भरगोस व भरीव पाठिंबा जाहीर करतानाच भारतीय क्रीडा मंदिराचे श्री. संजय शेटे यांनी ‘फिट मुंबई रन’ या कार्यक्रमाचीही घोषणा केली.
‘अमर हिंद मंडळाचे’ तसेच ‘मैदान बचाव समिती’चे श्री. भास्कर सावंत यांनी मैदानांसाठी उपसमिती नेमण्याची संकल्पना मांडली व खेळाची मैदाने वाचवणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी उलगडून सांगितले.
वापरत नसलेल्या मैदानांचा व क्रीडा सुविधांचा आढावा घेणे हे खूप गरजेचे आहे, असे प्रदीप गंधे यांनी मत व्यक्त केले. याचबरोबर ज्या महापालिकेच्या शाळा आहेत त्यांवर लक्ष देऊन त्यातील विद्यार्थ्यांना खेळात पुढे आणण्यासाठी त्या शाळा ‘मुंबई स्पोर्ट्स’ तर्फे प्रयत्न करण्यात यावेत अशी, ईच्छा व्यक्त केली.
‘दहीहंडीला मिळालेला साहसी खेळाचा दर्जा : योग्य की अयोग्य’ यावर विविधांगी चर्चा झाली. त्यावर सुनील वालावलकर, प्रदीप गंधे, नामदेव शिरगांवकर, महेंद्र चेंबूरकर व उदय देशपांडे यांनी आपापली मते व्यक्त केली.
