सर्वधर्मीय धर्मग्रंथातून प्रेरणा घेऊन एकात्मतेची भूमिका घ्यायला हवी – बिशप डॉ. थॉमस डाबरे
पुणे : ईश्वराने आपल्याला भारत देशात जन्माला घातले, हे आपले भाग्य आहे. भारत देश म्हणजे जगाला मिळालेली देणगी आहे. जगामध्ये अस्थिरता असताना भारत देशात मात्र शांतता पहायला मिळते. परंतु दुर्दैवाने देशात अजूनही जातीव्यवस्था टिकून आहे. जातीव्यवस्था ही देशाची शत्रू आहे. गीता, कुराण, संत तुकारामांचे अभंग यामध्ये समानतेचा आणि एकतेचा संदेश दिला आहे, तो लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. आपापल्या धर्मग्रंथातून प्रेरणा घेऊन एकात्मतेची भूमिका आपण घ्यायला हवी, असे मत पुणे धर्मप्रांताचे बिशप डॉ. थॉमस डाबरे यांनी व्यक्त केले.
पुणे महानगरपालिका स्वच्छंद आरोही व झळकी नागेश यांच्यावतीने ‘सारे जहाँ से अच्छा’ या सर्वधर्मीय एकतेचा संदेश देणाऱ्या आंतरधर्मीय सुसंवाद व देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सातारा रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. ए.पी. कुलकर्णी, रणजीत शहा, प्रा.रवींद्र शाळू उपस्थित होते.
डॉ. थॉमस डाबरे म्हणाले, सर्वधर्म आणि सर्व धर्मीयांनी देशाला बनविले आहे. सामाजिक आणि एकतेच्या क्षेत्रात देशातील सगळ्यांचेच योगदान आहे. त्यामुळे सर्वांनी प्रेमाने आणि बंधुभावाने रहा. जातीव्यवस्था ही देशाची शत्रू आहे. सर्व माणसे समान आहेत. जातीव्यवस्था आणि धार्मिक भेदाभेद नष्ट होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रा.रवींद्र शाळू म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘सारे जहाँ से अच्छा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध धर्मांमधील सुसंवाद वाढावा आणि संगीताच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणावे, हा कार्यक्रमामागील हेतू होता. मागील १६ वर्षांपासून अखंडितपणे हा कार्यक्रम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
सत्यम शिवम सुंदरम… देश प्रेमीयो आपस मे प्रेम करो देश प्रेमीयो… जिस देश मे गंगा बहती है… सारे जहाँ से अच्छा आधी देशभक्तीपर गीते यावेळी सादर झाली. रवींद्र शाळू यांनी गायलेल्या ‘जिस देश मे गंगा बहती है’ या गीताने रसिकांची मने जिंकली. तसेच आरती आठल्ये यांनी गायलेल्या ‘तोरा मन दर्पण’ या गाण्याला रसिकांनी विशेष दाद दिली. आरती आठल्ये, साधना शर्मा, लता रामप्रसाद, श्रीनिवास ठोंबरे, रवींद्र शाळू यांनी गीते सादर केली. डॉ रूपाली चौधरी यांनी निवेदन केले.
