जीवनाला स्वर्गात परिवर्तन करणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म – गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री
पुणे : अथर्वशीर्षातील अथर्व हा केवळ शब्द नाही. ती अवस्था आहे. थर्व नावाचा धातू असून गती असा त्याचा अर्थ आहे. त्याला अ हे अक्षर लावले, तर गतीरहित व्हायचे, असा त्याचा अर्थ होतो. शीर्ष म्हणजे डोके शांत ठेऊन प्रगती साधत आनंदी, सुखी, समाधानी कसे व्हावे, हे अथर्वशीर्षाने सांगितले आहे. ख-या अर्थाने जीवनाला स्वर्गात परिवर्तन करणारे शास्त्र म्हणजे हे अध्यात्म आहे, असे मत गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री यांनी व्यक्त केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित महोत्सवात श्री गणपती अथर्वशीर्ष निरुपण कार्यक्रमाचा प्रारंभ नुकताच झाला. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, माऊली रासने, बाळासाहेब सातपुते आदी उपस्थित होते.
स्वानंद पुंड शास्त्री म्हणाले, प्रचंड गतीने लोक पुढे जातात आणि नक्की काय करतात, हे आपण अनेकदा पाहिले आहे. पुढे जाऊन वाचविलेल्या वेळेचा सदुपयोग केल्यास ते उपयुक्त आहे. आपल्या मरणानंतर अध्यात्माचा काही उपयोग नाही. आपण जीवंत असतानाच त्याचे महत्व समजून घेतले पाहिजे. परिस्थिती नाही, तर आपली मन:स्थिती बदलण्याकरीता डोके शांत करा, असे अथर्वशीर्ष सांगते.
ते पुढे म्हणाले, अनेकजण मंदिरामध्ये भक्त म्हणून नाही, तर याचक म्हणून जातात. परमेश्वराकडे आपण काही ना काही मागत असतो. काहीतरी मागणे हा खरे तर भगवंताचा अपमान आहे. मोरया हा सर्वज्ञ आहे. तरी देखील आपण काहीतरी मागून त्याच्यावर आक्षेप घेतो. परमेश्वराला काही कळत नाही, असा याचा अर्थ होतो. आपला परमेश्वरावर सर्वतोपरी विश्वास असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दिनांक १३ आॅगस्ट पर्यंत दररोज सायंकाळी ६ ते ८ यावेळेत श्री गणपती अथर्वशीर्ष याविषयावर निरूपण होणार आहे. यामध्ये गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड शास्त्री हे श्री गणेशाशी निगडीत विविध कथा, अथर्वशीर्षाचे महत्व व महात्म्य याविषयी बोलणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य खुला असून भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
