Friday, June 5, 2026
ENTERTAINMENTLatest News

सोनालीचा लग्नसोहळा दिसणार ‘प्लॅनेट मराठी’वर

करोनाच्या काळात अनेक जोडप्यांची लग्न अगदी मोजक्या माणसांच्या उपस्थितीत पार पडली. यामध्ये अनेक सिनेतारकांचा देखील समावेश आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा विवाह तर लंडनमध्ये फक्त कुटूंबीयांच्या उपस्थितीतच पार पडला. यामुळे तिच्या अनेक चाहत्यांचा हिरमोड झाला. मात्र, आता आपल्या या आवडत्या अभिनेत्रीचा लग्न सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा लग्न सोहळा लवकरच ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीवर प्रेक्षकांना पाहाता येणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच एखाद्या अभिनेत्रीचा लग्न सोहळा ओटीटीवर दाखवला जाणार आहे. येत्या ११ ऑगस्ट पासून हा लग्नसोहळा काही भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

याविषयी बोलताना सोनाली कुलकर्णी म्हणाली, आपले लग्न धुमधडाक्यात व्हावे, हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. माझेही होते. परंतु जागतिक महामारीमुळे आम्ही रजिस्टर लग्न केले. त्यामुळे आमच्या लग्नात माझ्या माहेरच्या- सासरच्या कोणालाच सहभागी होता आले नाही. त्यामुळेच सर्व काही आलबेल झाल्यानंतर आम्ही आमच्या जवळच्या लोकांसोबत अगदी पारंपरिक पद्धतीने लग्न केले. त्यानंतर आधुनिक पद्धतीने रिसेप्शनही केले. खरंतर कलाकार हे नेहमीच आपल्या अनेक वैयक्तिक गोष्टी या खाजगी ठेवतात, मात्र मला माझा आयुष्यतील आनंदाचा क्षण माझ्या चाहत्यांसोबत शेअर करायचा आहे, म्हणूनच मी या सोहळ्याचे प्रसारण करण्याचे ठरवले. 

‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, सातासमुद्रापार लंडनसारख्या देशात सोनाली कुलकर्णी व कुणाल बेनोडेकर यांचे लग्न पार पडले होते. प्रत्येक चाहत्याला आपल्या आवडत्या कलाकाराच्या लग्नातील धमालमस्ती अनुभवायची असते. सोनालीचा चाहतावर्ग पाहता आम्ही तिचा संपूर्ण लग्नसोहळा ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. नुकतेच तिच्या या सोहळ्याचे ट्रेलर झळकले असून ते प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहे. लवकरच चाहत्यांना ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर लग्नाला उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading