fbpx

शहरातील रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे सात अभियंत्यांना आयुक्तांनी बजावल्या कारणे दाखवा नोटीस

पुणे : शहरातील रस्त्यांवरील खड्डे हे निकृष्ट कामामुळे पडल्याचे समोर आल्यानंतर आता ठेकेदारासोबत अधिकार्‍यांवरही ठपका ठेवला जात आहे. याचाच एक भाग म्हणून सात कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिल्या आहेत.
शहरातील रस्त्यांवर पहिल्याच पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. दीड ते दोन आठवडे सलग झालेल्या पावसाने शहरातील रस्त्यांची चाळण झाल्याचा परिणाम म्हणून शहरातील वाहतुकीचा वेग मंदावला, अनेक लहान सहान अपघात झाले, नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागला. यामुळे सर्वच स्तरातून प्रशासनावर टीका झाली.
अनेक नवीन रस्त्यांवर खड्डे पडल्याने महापालिकेने काम केलेल्या ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उगारला. रस्त्यांवर नक्की कोणत्या कारणांमुळे खड्डे पडले आहेत. हे शोध घेण्यासाठी एका त्रयस्थ संस्थेकडून शहरातील रस्त्यांचा सर्वे करण्यात आला. त्याचा अहवाल संबंधित संस्थेने महापालिकेला सादर केल्यानंतर ठेकेदाराचे दायित्व असलेल्या रस्त्यांवर फारसे खड्डे नाहीत, मात्र विविध खोदाईची कामे झालेल्या रस्त्यावर व ते रस्ते योग्यरित्या दुरुस्त न केल्याने खड्डे पडल्याचे समोर आले.
चुकीच्या पद्धतीने काम करणार्‍या ठेकेदारांना चुकीची कामे केल्याप्रकरणी दंड करण्यात येणार आहे. खड्ड्यांचे कमी, मध्यम, जास्त असे तीन प्रकार केले आहेत. मात्र, शहरातील रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंत्यांची असते. त्यामुळे पथ विभागाच्या 7 कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याच्या सूचना डॉ. खेमनार यांनी पथ विभागाच्या अधिकार्‍यांना केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: