गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पोलिसांत तक्रार
पुणे : एकनाथ शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या कारवर हल्ला झाला होता. याप्रकरणी काही शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ शिंदे गटातून आता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष आता पुढच्या टप्प्यावर जाताना पाहायला मिळत आहे. यातच आता उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, ते शिवसैनिक नव्हते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते, असा दावा केला आहे.
म्हसोबाला नाही बायको, सटवाईला नाही नवरा’, अशी अवस्था राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची झाली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनाच्या नावाखाली घोषणाबाजी करत असून राष्ट्रवादीकडूनच उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे, असा गंभीर आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झाली असून.
पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली गेली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली ही तक्रार नोंदवली गेली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, रोहन पायगुडे, वनराज आंदेकर, दिपाली धुमाळ, अंकुश काकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदन देऊन आल्यानंतर प्रशांत जगताप म्हणाले, आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची काही चूक नसताना उदय सामंत यांच्यावर आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तो एकदम चुकीचा आहे. भगवा घालून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उद्या सामंत यांच्या गाडीवर हल्ला केला. खरंतर हा वाद शिवसेना आणि शिंदे गटाचा आहे. आम्हाला आमचे जे दिवसभरातले कार्यक्रम असतात. त्यासाठी वेळ नसतो. गोपीचंद पडळकर ही डोक्यावर परिणाम झालेली व्यक्ती आहे. त्यांनी आधीही शरद पवार व राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केलेले आहेत. म्हणून आज आम्ही त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी तक्रार दाखल केली आहे. आम्ही त्यांचा निषेध करत आहोत . असे प्रशांत जगताप म्हणाले.