“शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती पुरस्कार-२०२२” आणि “श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्ती पुरस्कार-२०२२” हा सोहळा संपन्न
पुणे: पद्मविभूषण शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोप सोहळ्याचे औचित्य साधून ‘महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठान’, पुणे यांचा पहिला “शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती पुरस्कार” मूर्तीशास्त्राचे जेष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. सन्मान सोहळ्यापूर्वी जेष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांनी लिहिलेल्या मानपत्राचे वाचन करण्यात आले.
यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांच्या वडिलांच्या नावे “श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्ती पुरस्कार-२०२२” इतिहासाचे अभ्यासक संदीप तिखे यांना कार्यक्रमाच्या अध्यक्षा जेष्ठ गायिका उषा मंगेशकर आणि अमृत पुरंदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती पुरस्काराचे स्वरूप – रु. १ लाखाचा धनादेश, मानचिन्ह, मानपत्र असे होते. तर, श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्ती पुरस्काराचे स्वरूप – रु. ५०,००० चा धनादेश, मानचिन्ह असे होते. याप्रसंगी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, माजी खासदार प्रदीप रावत, उद्योजक पुनीत बालन, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, राधा पुरंदरे आगाशे, प्रतिष्ठानचे पदाधिकारी अभिषेक जाधव, ॲड. विशाल सातव व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या पुरस्कार वितरण सोहळयाच्या पूर्वार्धात “जाणता राजा” हे महानाट्य संक्षिप्त स्वरूपात सादर करण्यात आले. त्याचबरोबर बाबासाहेबांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या स्नेही गंगाताई पवार यांचादेखील सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमावेळी बाबासाहेबांच्यावर आधारित ‘शिवशाहीर’ या अनुबोधपटाची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली आणि त्याच्या पोस्टरचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या अनुबोधपटाच्या निर्मितीची जबाबदारी विनोद सातव यांच्यावर सोपवण्यात आली.पुरस्काराला उत्तर देताना डॉ. देगलूरकर यांनी ‘आता ऐसे कुणी राहिले नाही, या सम हा’ असे बाबासाहेबांचे वर्णन केले. असा पुरस्कार मिळायला भाग्य लागते अशा शब्दात त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या वेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘एखादं मिशन जगायचं कसं हे जसे बाबासाहेबांनी शिकवलं, तसंच मूर्ती आणि मंदिर बघायचं कसं हे देगलूरकर यांनी शिकवलं.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे सचिव अभिषेक जाधव यांनी केले. डॉ. प्रसन्न परांजपे यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
