Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

एंडोक्राइनोलॉजी आजार टाळण्यासाठी जीवनशैलीत बदलाची गरज – डॉ. शशांक जोशी

पुणे  : “ जगभरात कार्डिओ- मेटाबॉलिक आजारांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे.विशेषतः मधुमेह, उच्चदाब यांसारख्या जीवनशैलीविषयक आजार ही एक मोठी समस्या बनली आहे. अशा परिस्थितीत एंडोक्राइनोलॉजी आजार टाळण्यासाठी जीवनशैलीत बदलाची गरज आहे, असे मत डॉ. शशांक जोशी महाराष्ट्र राज्याच्या कोविड टास्कफोर्स’चे सदस्य आणि एंडोक्राइनोलॉजिस्ट पद्मश्री डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.

भारतात मंकीपॉक्सच्या साथीचा फारसा धोका नाही. मात्र आपल्याला आवश्यक काळजी घेतली पाहिजे. खासकरून गर्दीच्या ठिकाणी जसे की कार्यालये आणि आरोग्य सुविधा केंद्रे याठिकाणी वावरताना सुरक्षेच्या नियमांचे पालन केले पाहिजे,’’ असेही त्यांनी सांगितले.

पुणे ऑबस्ट्रेटीक अँड गायनोकोलॉजीकल सोसायटीतर्फे (पीओजीएस) आयोजित ‘रिप्रोडकटीव्ह एंडोक्राइनोलॉजी (एनसीआरई )’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या’च्या उदघाटनप्रसंगी डॉ. जोशी बोलत होते. विमाननगर येथील हयात रिजेन्सी हॉटेल येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. अलका कृपलानी या होत्या. यावेळी पीओजीएस’चे अध्यक्ष डॉ. पराग बिनीवाले, उपाध्यक्ष डॉ. मिलिंद दुगड, खजिनदार डॉ. चैतन्य गणपुले, सरचिटणीस डॉ. आशिष काळे, क्लिनिकल सेक्रेटरी डॉ.मंजिरी वळसंगकर, परिषदेच्या समन्वयक डॉ. राखी सिंग, डॉ. अमोल लुंकड, आणि डॉ.पंकज सरोदे उपस्थित होते.

डॉ. जोशी म्हणाले, “ करोनाचा धोका आता तितकासा गंभीर नाही राहिला. मात्र अद्यापही विविध विकारांचे मोठे आव्हान आरोग्य क्षेत्रासमोर आहे. विशेषतः मधुमेह, उच्चदाब यांसारख्या जीवनशैलीविषयक आजार ही एक मोठी समस्या बनली आहे. २०१७ साली प्रकाशित झालेल्या एका अहवालात दरवर्षी ४० लाख नागरिकांचा अशाप्रकारच्या विकारामुळे मृत्यू होत असल्याचे म्हटले आहे. मात्र २०१९ साली प्रकाशित झालेल्या अहवालात हे प्रमाण वाढून ६८ लाख झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. जगभरात कार्डिओ- मेटाबॉलिक आजारांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. ’’

या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनात काही नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्यामध्ये वेळेवर,कमी आणि हळू हळू जेवण करणे, शारिरीक हालचाल आणि पुरेशी झोप या त्रिसूत्रीचा समावेश आहे. सर्वच नागरिकांनी याबाबत दक्ष असायला हवे, असेही डॉ. जोशी यांनी सांगितले.

प्राचीन भारतीय वैद्यकशास्राबाबत बोलताना डॉ. जोशी म्हणाले, “ एखाद्या रोग, आजाराबाबत संशोधन करत असताना, आपण प्राचीन भारतीय औषधोपाचार आणि पद्धती यांना धूडकावून लावणे योग्य ठरणार नाही. आपल्या वैद्यकीय पद्दतीबाबत वेगवगेळ्या काळातील प्रभावामुळे अनेक चुकीचे समज पसरविण्यात आले आहे. मात्र आपल्या प्राचीन भारतीय साहित्यात पुष्कळ अशा गोष्टी आहेत, ज्यावर आपल्याला पुन्हा काम करण्याची गरज आहे. त्यामुळे वैद्यकीय शास्त्रज्ञ म्हणून त्यावर टीका करण्यापेक्षा, त्यातून काही चांगले विज्ञान निर्माण केले पाहिजे.’’

डॉ. कृपलानी म्हणाल्या, “ हे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यासाठी पीओजीएस’चे मी मनापासून कौतुक करते. कोणतेही कार्य अधिक चांगले आणि यशस्वी करण्यासाठी तुमच्याकडे एक चांगाली टीम असणे आवश्यक असते. त्यामुळे एक चांगली टीम तयार करण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे.’’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading