मूक बधिर मुलांनी लुटला आनंद ‘हसरा श्रावणाचा ‘
,पुणे – अनाथ, मूक बधिर मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आणि त्यांच्या खडतर आयुष्यात काही काळ आनंद निर्माण करता आला ..हीच खरंतर ईश्वर सेवा आहे, अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण मासारंभाचा याप्रकारे सेवा करुन शुभारंभ करता आला हे माझे भाग्य आहे.. असे मत सुप्रसिद्ध एकपात्री कलाकार,अभिनेते संतोष चोरडिया यांनी व्यक्त केले.
रंगकर्मी चोरडिया फाउंडेशन आणि आयली’ज डान्स अँड आर्ट अँकँडमीच्या वतीने टिंगरेनगर येथील सी.आर.रंगनाथन निवासी मूक बधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘हसरा श्रावण ‘ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
केवळ सांकेतिक भाषा, खाणा खुणाच समजणार्या या विद्यार्थ्यांना एकपात्री कलाकार,अभिनेते संतोष चोरडिया आणि अभिनेत्री डाँ.कविता घिया यांनी देहबोलीतून विनोदी किश्शांवर या मुलांना खळखळून हसविले तर गायक राजेश शिंगाडे आणि गायिका सोनाली अय्यंगार यांनी ‘इतनी शक्ती हमे देना दाता, ‘रुक जाना नहीं तू कही हारके ‘ , ‘ जीवन में कभी डरना नहीं ‘ अश्या गाण्यांच्या माध्यमातून मुलांचे प्रबोधन केले.संगीतकार शैलेश येवले यांनी कि बोर्डवर तर विजय भोंडे यांनी ड्रम मशिनवर मोलाची साथ दिली.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सदाकळे म्हणाले की , ” समाजातील दुर्लक्षित या मूक बधिर मुलांना हसवून , गाण्यांवर नाचवून, त्यांना प्रेमाची झप्पी देणाऱ्या संतोष चोरडिया आणि टीम जे सत्कर्म करीत आहे त्याला आमचा सलामच.खूप कमी कलाकार अशी सामाजिक बांधिलकी जपतात .
याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनिता ताई मदाने, शाळेचे मुख्याध्यापक भोसले सर, शाळेचे विश्वस्त ,संवादक आकाश सर, शिक्षकवृंद ,सुमारे २५० हून विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.
