fbpx

आयुर्वेदामध्ये अनेक सूक्ष्म गोष्टींचा विचार  – ज्येष्ठ वैद्य प्रशांत सुरु यांचे मत

पुणे :  सृष्टीमध्ये उत्पत्ती जशी होते, तशीच जीवाची उत्पत्ती मातेच्या उदरात होते आणि गर्भ तयार होऊन मुल जन्माला येते. आकाश, पृथ्वी, पाणी, तेज, वायू  या पंच महाभूतापासून देहाची निर्मिती होते आणि यामध्येच देह विलीन होतो. आयुर्वेदामध्ये  या आणि अशा अनेक सूक्ष्म गोष्टीचा विचार केला आहे. कोणते औषध केव्हा वापरायचे, हे पंचमहाभूतांचा विचार करून द्यायला पाहिजे, असे मत ज्येष्ठ वैद्य प्रशांत सुरु यांनी व्यक्त केले.
कै.वैद्य चंद्रकांत उर्फ नाना लावगनकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा यशस्वी युवा वैद्य पुरस्कार वैद्य सर्वेश कुलकर्णी आणि वैद्य समीर कुलकर्णी यांना पटवर्धन बागेतील धन्वंतरी सभागृहात आयोजित कार्यक्रमात देण्यात आला. यावेळी वैद्य लक्ष्मण चंद्रकांत लावगनकर, वैद्य केदार जोशी, ज्येष्ठ वैद्य विनय वेलणकर उपस्थित होते.

सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्गुच्छ आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. वैद्य प्रशांत सुरु यांचे पांचभौतिक चिकित्सा पद्धती-एक सर्वांगीण विचार या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमासाठी लिडजेन आयुर्वेदिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे सहकार्य मिळाले. त्यांच्या संकेतस्थळाचे उद्घाटन यावेळी झाले.

वैद्य प्रशांत सुरु म्हणाले, पांचभौतिक चिकित्सा प्रत्यक्ष अनुभवातून शिका. ही चिकित्सा पद्धती रोजच्या जीवनात देखील पाहायला मिळते. रोजच्या जीवनातील सगळ्या गोष्टी पांच भौतिक आहेत. पांच भौतिक चिकित्सा वेगळी नाही. पांचभौतिक चिकित्सा पद्धती ही आयुर्वेदाच्या सिद्धांताला धरून आहे

ते पुढे म्हणाले, पांच भौतिक औषधे रोजच्या स्वयंपाक घरात देखील पहायला मिळतात. त्याचे गुणधर्म लक्षात घ्या. सृष्टीत त्याची उत्पत्ती कशी होते हे लक्षात घ्या. प्रत्येक द्रव्यातील पांच भौतिक गुणधर्म समजून घ्या आणि त्याचा वापर करा, असेही त्यांनी सांगितले.

वैद्य समीर कुलकर्णी म्हणाले,  कै. वैद्य नाना लावगनकर यांनी  केलेले काम हे अतुलनीय आहे. त्यांच्या परंपरेत आध्यात्मिक बैठक आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हे मी माझे भाग्य समजतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

वैद्य लक्ष्मण लावगनकर म्हणाले, आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी  आयुष्य झिजवणाऱ्या कै. वैद्य चंद्रकांत उर्फ नाना लावगनकर यांनी वैद्यपंरपरेत स्वतःचा ठसा उमटवला आहे. उत्तमोत्तम वैद्य घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ्य पुरस्कार प्रदान करण्यात येतो, असेही त्यांनी सांगितले. वैद्य माधव भागवत यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: