राजस्थानचा मनोज तरड ‘घाटाचा राजा’ तर दिनेश कुमार ठरला राष्ट्रीय विजेता
पुणे : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्य सायकल स्पर्धेमध्ये राजस्थानच्या मनोज तरड ‘घाटाचा राजा’ तर सेनादलाचा दिनेश कुमार हा राष्ट्रीय विजेता ठरला.
बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात आयोजित दिमाखदार सोहळ्यामध्ये बारामती टेक्स. पार्कच्या चेअरमन सुनेत्रा पवार, दत्तात्रय भरणे, आ. अमोल मिटकरी, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, विश्वास नाना देवकाते, पोर्णिमा तावरे, पुरूषोत्तम जगताप, किरण गुजर, राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, प्रताप गायकवाड, सचिन सातव आदी मान्यवर उपस्थित होते.
या राष्ट्रीय सायकल स्पर्धेमध्ये पुणे ते बारामती पुरूष गटाच्या राष्ट्रीय स्तरावर दिनेश कुमार हा 2 तास 33 मिनिटे या विक्रमी वेळेत 120 किमीचे अंतर पार करत विजेता ठरला तर मुकेश कुमार (राजस्थान, 2 तास 34 मि) व के. व्ही. व्यासख (कर्नाटक, 2 तास 37 मि) यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला तर सासवड ते बारामती गटात उत्तर प्रदेशच्या दिनेश कुमार (1 तास 34 मि) याने पहिला क्रमांक पटकावला. त्याचबरोबर पुणे ते बारामती राज्य स्तर पुरुष गटामध्ये सुर्या रमेश (पुणे), सिद्धेश पाटील (क्रिडा प्रबोधिनी पुणे) व ओम बाळासाहेब (अहमदनगर) यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. या स्पर्धेचे वैशिष्ट्य असलेला ‘घाटाचा राजा’ हा बहुमान राजस्थानच्या मनोज तरड याने पटकावला. त्याने राष्ट्रीय स्तरावर विक्रमी 9 मिनिटे 34 सेकंदामध्ये दिवे घाट पार केला तर राज्य स्तरावर सिद्धेश पाटील याने हा 9 मिनीटे 57 सेकंदामध्ये हा बहुमान मिळवला.
त्याचबरोबर मेन इलाईट सासवड ते बारामती (85 किमी) स्पर्धेत रविंद्र बदाणे, विठ्ठल भोसले व विकास रोठे यांनी पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. त्याचबरोबर माळेगाव ते बारामती (15 किमी) महिलांच्या राष्ट्रीय सायकल स्पर्धेमध्ये मणिपूरच्या मयंगलम चानू हिने प्रथम क्रमांक पटकावला असून महाराष्ट्राच्या मनाली राठोजी व कर्नाटकच्या शहा कुडीगनूर यांना प्रथम व द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. 16 ते 17 वर्षे (15 किमी) माळेगाव ते बारामती मुलींच्या गटात श्रावणी परीट, अनुष्का राऊत व आर्या नानवरे तर मुलांच्या गटात हर्षद पाटील, जयदीप काटकर व ओम काटे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला असून 14 व 15 वर्षाच्या गटात उत्कर्ष गार्दी व शिरीषकुमार शिंदे याने पहिले व दुसरे तर मैत्रेय भालेराव याने तिसरे स्थान मिळविले.
