जगद्गुरू तुकोबाराय हे वारकरी संप्रदायाचे कळस – ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
पुणे : जगद्गुरू तुकाराम महाराजांनी अभंगातून संवाद साधला. ज्ञानोबा तुकाराम ही अधिष्ठान आहेत. जे आपण करतो, त्यात अहंकार असतो. मात्र जिथे प्रेम, भक्ती आहे, तेथे हा संप्रदाय सुरू आहे. कळस पूर्ण झाल्याशिवाय मंदिर पूर्ण होत नाही. त्याप्रमाणेच तुकोबाराय हे वारकरी संप्रदायाचे कळस आहेत, असे मत ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांनी व्यक्त केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित महोत्सवात प्रवचन, कीर्तन व श्री गणपती अथर्वशीर्ष निरुपण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांनी जगद््गुरु तुकाराम महाराजांचे निवडक अभंग याविषयावर निरुपण केले.
बाबा महाराज सातारकर म्हणाले, पंढरीच्या वारीत पूर्वी काही हजार वारकरी असत. आता हा समुदाय काही लाखांच्या घरात गेला आहे. ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष व नामस्मरण केले, तर पांडुरंग आनंदी होतो. परमार्थ पाहावा, तर वारकरी संप्रदायात पाहावा.
ते पुढे म्हणाले, सर्वसामान्यांना कळेल, अशा भाषेत सांगायला हवे. वाक्यातून वाणीतून प्रकट होणारी प्रेमावस्था ही अभंगवाणी आहे. त्यामुळे तुकाराम महाराजांनी ती अभंगातून मांडली. त्यामुळे ज्ञानाची प्रेम प्रतीती जिथे तुकली गेली ते तुकोबाराय. ज्ञानेश्वर महाराजांचे ज्ञान व तुकाराम महाराजांचे प्रेम हे अद्भुत आहे. त्यातून संतांनी प्रेमाने सर्वांना जवळ केले. प्रेम हाच खरा चमत्कार आहे.
चातुर्मास प्रवचनांतर्गत संपूर्ण हरिपाठ याविषयावर दिनांक १७ ते ३१ जुलै दरम्यान दररोज सायंकाळी ७ ते ८ यावेळेत प्रवचने होत आहेत. यामध्ये ह.भ.प. बाबामहाराज सातारकर, ह.भ.प. चिन्मय महाराज सातारकर व ह.भ.प. भगवतीताई सातारकर – दांडेकर या निरुपण करीत आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य खुला आहे. तरी भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.