Wednesday, June 10, 2026
ENTERTAINMENTLatest News

New Show – ”जिवाची होतिया काहिली” या नव्या मालिकेतून उलगडणार कानडी तडक्याची नवी प्रेमकहाणी

पुणे : सोनी मराठी वाहिनी सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. भक्ती, शौर्य, हास्य, थरार, शृंगार अशा सगळ्या प्रकारांत मोडणाऱ्या मालिका प्रेक्षकांना बघायला मिळतात. १८ जुलैपासून प्रेक्षकांना एक नवीकोरी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे.

‘जिवाची होतिया काहिली’ ही मराठी आणि कानडी यांच्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांचा लाडका, कोल्हापूरचा रांगडा गडी अभिनेता राज हंचनाळे तर नायिका म्हणून प्रतीक्षा शिवणकर दिसणार आहे. या दोघांची प्रमुख कलाकार म्हणून ही पहिलीच मालिका आहे. ‘जिवाची होतिया काहिली’ असं मालिकेचं नाव असून मराठी आणि कानडी भाषांचा मिलाप यात होणार आहे. राज अस्सल कोल्हापुरी मुलाची तर प्रतीक्षा कानडी मुलीची भूमिका साकारणार आहे.

मालिकेची झलक प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. प्रेमाला भाषा नसते, हे त्यातून दिसलं. कानडीचा आणि मराठीचा झकास तडका दुसऱ्या वेळेस बघायला मिळाला. ‘पिरती दोघांची भाषेपलिकडची’ असा संदेश या मालिकेतून समजतो आहे. प्रेमाला भाषा, धर्म असं काही नसतं. खरं प्रेम असेल तर या सगळ्या गोष्टी दुय्यम ठरतात हे यातून समजत आहे. मुख्य कलाकरांबरोबरच आकर्षण ठरले आहेत.

नायक-नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारणारे दोन अनुभवी कलाकार. अर्थातच विद्याधर जोशी आणि अतुल काळे. हे दोन्ही दिग्गज कलाकार एका नव्या भूमिकेत, नव्या वेशात प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. विद्याधर जोशी हे अस्सल कोल्हापुरी वेशात तर अतुल काळे यांचा कर्नाटकी पोशाख प्रेक्षकांना आवडतो आहे. अभिनेत्री सीमा देशमुख आणि भारती पाटील यांच्या भूमिका देखील प्रेक्षकांना आवडल्या आहेत.

कन्नड आणि मराठी कुटुंबं एकाच घरात, एकाच छताखाली कसे राहणार, हा चर्चेचा विषय ठरला आहे. आणि त्यातही त्यांच्यात होणारं भांडण आणि घरातल्या घरातच मारली जाणारी सीमारेषा प्रेक्षकांना आवाक करते आहे. मराठी मालिकेत कानडी तडका पहिल्यांदाच बघायला मिळत असल्याने ही प्रेमकहाणी कोणतं नवं वळण घेणार, ही उत्सुकतेची बाब ठरणार आहे. मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक सुबोध खानोलकर हे सांभाळत आहेत. याआधी देखील त्यांच्या मालिकांनी प्रेक्षकांवर भुरळ पाडली. त्यामुळे ही मालिका देखील प्रेक्षकांच्या मनात राज्य करेल यात शंका नाही.

मालिकेतल्या अनेक गोष्टी प्रेक्षकांना निश्चितच आवडतील. कोल्हापुरी भाषेवरचा कानडी तडका, प्रतीक्षाने साकारलेली कर्नाटकी मुलगी, विद्याधर जोशी आणि अतुल काळे या जोडगोळीचं ऑन स्क्रीन भांडण, आणि भाषेपलीकडचं प्रेम. त्यामुळे १८ जुलैपासून पाहायला विसरू नका ‘जिवाची होतिया काहिली फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading