fbpx

Mumbai Rain – मुसळधार पाऊस; रस्ते वाहतुकीला ब्रेक, तर मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

मुंबई : शहर आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी सकाळपासून पावसाने जोर धरला असून सखल भागांत पाणी साचले आहे. पावसाची संततधार कायम असल्याने रेल्वे वाहतुकही विस्कळीत झाली आहे. रस्ते जलमय झाल्याने नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे. तसेच, हवामना विभागानेही मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

मुंबईत सतत पडत असल्यामुळे दादर, सायन, माटुंगा, परळ, किंग्ज सर्कल, गांधी मार्केट परिसरात पाणी साचले आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. शिवाय मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळही पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशिराने सुरू आहे. परिणामी, रेल्वे प्रवाशांचा स्थानकात खोळंबा होत आहे. शिवाय लोकल वाहतूक उशिराने धावत असल्याने रेल्वे स्थनकात प्रवाशांची मोठी गर्दी जमली आहे.

मुंबईच्या अंधेरीमधील सब-वे पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी हा सब-वे बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान मुंबईसह आसपासच्या परिसरात रस्त्यांवर पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना महापालिका प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच, गरज पडल्यास घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्रात मागच्या दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. हवामान खात्याने  दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात अनेक जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने अनेक धरण भरली आहेत. तर काही धरण कधीही भरु शकतात अशी स्थिती आहे.

पुढच्या दोन तासात मुंबई, ठाणे आणि रायगड आणि पालघरच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या आठ दिवसांपासून मध्यम आणि मुसळधार पद्धतीचा पाऊस सुरु असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. त्यामुळे तिथं एनडीआरएफचं पथक दाखल करण्यात आलं आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: