fbpx
Monday, September 25, 2023
Latest NewsPUNE

वारी, पालखी सोहळा महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव – डॉ. सदानंद मोरे

पुणे : “संतांनी महाराष्ट्राला सलोखा, समतेचा, मूल्यांचा वारसा दिला. ज्ञानेश्वर ते निळोबा यांच्यापर्यंत संतांनी आपल्या साहित्यातून मराठी भाषा समृद्ध केली आहे. मोठी परंपरा असलेली वारी ही विठ्ठलाची उपासना आहे. वारकरी नाही असे एकही गाव महाराष्ट्रात नाही. लाखोंच्या संख्येने एकत्रितपणे भक्तिरसात न्हाऊन निघणारा वारीचा, पालखी सोहळा महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे,” असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

आषाढी एकादशीनिमित्त लोकमान्य हास्ययोग संघ परिवाराच्या वतीने आयोजित ‘पंढरीची वारी’वरील व्याख्यानात डॉ. सदानंद मोरे बोलत होते. व्याख्यानासह दिंडी सोहळा, विठ्ठल-रुक्मिणी पूजन, अभंग गायन झाले. कोथरूड येथील राजलक्ष्मी सभागृहात झालेल्या सोहळ्याप्रसंगी हास्ययोग परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुभाष देसाई, उपाध्यक्ष डॉ. जयंत मुळे, उपाध्यक्ष बंडोपंत फडके, सचिव पुष्पा भगत, माजी नगरसेविका वैशाली मराठे, पुनीत जोशी, डॉ. संदीप बुटाला, महेश साने, जयंत भिडे आदी उपस्थित होते.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, “पंढरीच्या वारीला मोठी परंपरा आहे. वारी ही सामुदायिक उपासना आहे. दिंडी हे वारीचे युनिट असून, मृदुंग, टाळ व वीणा यांच्या स्वरांतून आणि वारकऱ्यांच्या सुरांतून निर्माण होणारा भक्तिरस अवर्णनीय आहे. मासिक, तिथी, आषाढी-कार्तिकी किंवा आषाढी वारी करण्याची प्रथा आहे. ज्ञानोबा-तुकोबांच्या आधीपासून वारी सुरु आहे. नारायणबाबांनी वरील पालखी सोहळ्यात आणले. वारकरी आणि विठ्ठल हे नाते घट्ट आहे. लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद नसणारा हा सोहळा आहे. “

“आजच्या काळात प्रत्येकजण विश्वाशी जोडू शकतो. मात्र, संतांनी वारीच्या माध्यमातून एकमेकांना जोडण्याचे काम केले. वारीने महाराष्ट्राला ‘नेटवर्किंग’ दिले. संत साहित्याने परमार्थाची, हास्यपूर्ण जगण्याची शिकवण दिली. नितीधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न केले. संभाजीराजे, राजराम महाराज, राणी ताराबाई, शाहू महाराज यांनी वारीला संरक्षण दिले. काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या असल्या तरी वारीचे महात्म्य कायम आहे,” असे डॉ. सदानंद मोरे यांनी नमूद केले.

तत्पूर्वी, सकाळी विठ्ठल-रुक्मिणी पूजन, पालखी सोहळा व दिंडी प्रदक्षिणा झाली. कुंदा पानसे यांच्या सुमधुर अभंग गायनाने भक्तिरसाची अनुभूती दिली. लोकमान्य हास्ययोग संघ परिवाराच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित होत असलेल्या स्मरणिकेविषयी शरद महाबळ यांनी माहिती दिली. डॉ. प्रसाद आंबीकर व डॉ. मानसी आंबीकर यांनी ओघवते सूत्रसंचालन केले. अनुराधा भांडारकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: