fbpx

‘स्मार्ट’प्रकल्पांतर्गत सेंद्रीय शेतमाल विक्रीसाठी महानगरपालिकेतर्फे जागा

पुणे : मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यात ‘अर्बन फूड सिस्टिम’ राबविण्यात येत असून त्याअंतर्गत ग्राहकांपर्यंत सेंद्रीय आणि विषमुक्त शेतमाल पोहोचविण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत जागा व ओटे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

शहरी बाजारपेठेत सेंद्रिय किंवा विषमुक्त शेतमालाची मागणी जास्त आहे. शहरी बाजारपेठेच्या मागणीनुसार सेंद्रीय किंवा विषमुक्त शेतमाल पुरवठा करावयाचा आहे. असा शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘अर्बन फुड सिस्टीम’अंतर्गत आत्मा, कृषी विभाग, पणन विभाग व पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत शेतकरी आठवडे बाजार, सुनियोजित किरकोळ बाजार, मिड डे मिल या संकल्पनेतील शाळांचे किचन व ओटा मार्केटच्या माध्यमातून प्राधान्यक्रमाने उपक्रम राबविण्यात येणार आहे. याकरिता पुणे महानगरपालिकेमार्फत जागा व ओटे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विषमुक्त शेतमाल पिकवून पुणे शहरात स्वखर्चाने वाहतूक करुन विक्री करण्यास इच्छुक जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गटांनी यासाठी अर्ज सादर करावे.

इच्छुकांनी अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना आदी माहितीकरिता प्रकल्प संचालक, आत्मा पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गटांनी अर्जामध्ये नमूद माहिती भरुन आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज पुणे जिल्हा प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालयात २० जुलै २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे स्मार्ट प्रकल्पाच्या जिल्हा अंमलबजावणी प्रमुखांनी कळविले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: