fbpx
Friday, April 19, 2024
ENTERTAINMENTLatest News

सुमीत राघवनचा ‘एकदा काय झालं!!’ येणार ५ ऑगस्टला!

‘एकदा काय झालं!!’ हे वाक्य आपल्या सगळ्यांना अगदी लहानपणापासूनच परिचित असतं. या वाक्यापासून सुरूवात होणाऱ्या असंख्य गोष्टी आपण लहानपणापासून कोणानाकोणाकडून ऐकतो… अशाच वेगवेगळ्या भावनिक गोष्टींमधून साकारलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार हे नक्की. नात्यांचे बंध, भावनांचे अर्थ, एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम, जिव्हाळा आणि या सर्वांच्या जोडीला गोष्टी! या सगळ्या कंगोऱ्यांची सांगड घालत साकार झालेला ‘एकदा काय झालं!!’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला ५ ऑगस्टला येत आहे.

आशयघन कथानक आणि उत्तम कलाकारांची मांदियाळी घेऊन चित्रपट दिग्दर्शित करणे ही डॉ. सलील कुलकर्णी यांची खासियत आहे. त्यांच्या ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली होती. यानंतर पुन्हा एकदा डॉ. सलील कुलकर्णी एक सुंदर कलाकृती प्रेक्षकांसमोर आणण्यास सज्ज आहेत. ‘एकदा काय झालं!!’ या चित्रपटाची घोषणा त्यांनी कोरोनापूर्वीच केली होती. मात्र, आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. अभिनेता सुमीत राघवन हा अनेक वर्षांनी पुन्हा एकदा मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल.

‘एकदा काय झालं!!’च्या मोशन पोस्टरमध्ये गोष्टींची अनेक पुस्तकं दिसत आहेत. तसेच सुमीत राघवन यांच्यासोबतच मोहन आगाशे, सुहास जोशी, उर्मिला कोठारे, पुष्कर श्रोत्री या दिग्गज कलाकारांसोबत बालकलाकार अर्जुन पुर्णपात्रे या चित्रपटात पदार्पण करणार हे स्पष्ट होत आहे. डॉ. सलील कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार अशी तिहेरी कामगिरी केलेली आहे. प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचे मार्गदर्शन या चित्रपटाला लाभले आहे, तर त्यांचा मुलगा आणि संगीतकार सिद्धार्थ महादेवन या चित्रपटाची निर्मिती करत आहे.

‘एकदा काय झालं!!’ हा चित्रपट पुणे टॉकीज प्रायव्हेट लिमिटेड आणि हेमंत गुजराथी प्रस्तुत करत आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती गजवदन प्रॉडक्शन्सचे अरूंधती दाते, अनुप निमकर, नितीन प्रकाश वैद्य आणि डॉ. सलील कुलकर्णी तसेच शोबॉक्स एन्टरटेंन्मेंटच्या सिद्धार्थ महादेवन, सौमिल श्रुंगारपुरे, सुमेंदु कुबेर आणि सिद्धार्थ खिंवसरा यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading