मुख्यमंत्र्यांचा निरोपाचा संवाद? माझ्याच लोकांनी मला दगा दिला म्हणून …
मुंबई : माझ्याकडून कोणी दुखावले गेले असेल, कोणाचा अपमान झाला असेल तर मला माफ करा. माझ्याच लोकांनी मला दगा दिला. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. आजपर्यंत तुम्ही दिलेल्या सहकार्या बद्दल धन्यवाद, अशा भावूक शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळ बैठकीत आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधला.
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षा नंतर उद्या ठाकरे सरकार बहुमत सिद्ध करण्याच्या चाचणीला सामोरे जाणार आहे. त्यापूर्वी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली. मंत्रालयाच्या दालनात जाण्यापूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोसमोरही ते नतमस्तक झाले.या बैठकी नंतर मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रलंबीत प्रस्ताव मंजूर केले. तर शेवटी आपल्या दोन्ही सहकारी पक्षाचे आभार व्यक्त केले. तेव्हा ते भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले.
कॉँग्रेसचे क्रीडा व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी या अडीच वर्षात खूप छान काम केले आहे. प्रसशाकीय आणि वैयक्तिक अशा दोन्ही पररिस्थितींना ते मोठ्या धाडसाने सामोरे गेले आहेत.
