fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsMAHARASHTRA

महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी 3 जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई :: विविध 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी असलेली 1 जुलै 2022 पर्यंतची मुदत आता 3 जुलै 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित महानगरपालिका, त्यांचे संकेतस्थळ आणि ट्रू- व्होटर मोबाईल ॲपवरही उपलब्ध आहेत. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत होती; परंतु ही मुदत आता 3 जुलै 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यासाठी रविवार व शनिवारच्या सुट्टीच्या दिवशीदेखील आवश्यक ती व्यवस्था करण्यात येणार आहे.

महानगरपालिका कार्यालय किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या ठिकाणी आणि ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील हरकती व सूचना दाखल करता येतील. ट्रू- व्होटर मोबाईल ॲप ‘प्ले स्टोअर’वरून आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करता येईल. त्याआधारे प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत आपले नाव शोधून त्याबाबत हरकत असल्यास तीही दाखल करता येईल. ‘व्होटर लीस्ट’ सर्च या मेनूवर क्लिक केल्यावर आपले नाव व मोबाईल नंबर टाकून पुढे जाता येईल. नाव शोधल्यावर आपला संपूर्ण तपशील दिसू शकेल. त्यासंदर्भातील हरकतीसाठी ‘व्होटर लीस्ट ऑबजेक्शन’ यावर क्लिक करून ‘व्होटर लीस्ट इलेक्शन प्रोग्राम 2022’ निवडून पुढे योग्य त्या पर्यायावर जाऊन आपली हरकत नोंदविता येईल.
विधानसभा मतदारसंघाची यादी प्रभागनिहाय विभाजित करताना त्यात नवीन नावांचा समावेश करणे किंवा नावे वगळण्याचा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही. एखाद्या मतदारास चुकीचा प्रभाग वाटप झाल्यास किंवा विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही महानगरपालिकेच्या मतदार यादीत नाव नसल्यास, हरकत दाखल करता येते. हरकती व सूचना दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असली तरी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 9 जुलै 2022 रोजीच प्रसिद्ध करण्यात येतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading