जीवनदृष्टीमुळेच जगणे प्रकाशमान होते : प्रा. मिलिंद जोशी
पुणे : सामान्य माणसांना जे उघड्या डोळ्यांनी दिसत नाही ते दिव्यांगांना अंतःचक्षूमुळे आणि जीवनदृष्टीमुळे दिसते. केवळ दृष्टीमुळे नव्हे तर जीवनदृष्टीमुळे जगणे प्रकाशमान होते, असे मत प्रसिद्ध लेखक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
आडकर फौंडेशनतर्फे ज्येष्ठ दृष्टीहीन आणि मूकबधिर सामाजिक कार्यकर्त्या डॉ. हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा डॉ. हेलन केलर स्मृती पुरस्कार यंदा नेत्रहीन संगीत शिक्षक दीपक उपाध्ये यांना ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रा. जोशी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष राजीव बर्वे, ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डाॅ. दीपक शिकारपूर, आडकर फौंडेशनचे अॅड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. जोशी म्हणाले, ‘ आयुष्यात जे मिळाले नाही त्याचीच खंत माणसांना वाटते पण जे न मागता परमेश्वराकडून मिळाले त्याविषयीही कृतज्ञ असले पाहिजे. माणसे आपल्या दुःखांना खूप सजवतात म्हणून ती मोठी वाटतात. इतरांच्या वाट्याला येणाऱ्या दुःखांशी तुलना केल्यानंतर आपले दुःख किती छोटे आहे याची जाणीव होते. प्रतिकूलतेतून अनुकूलता निर्माण करण्यातच खरा पुरुषार्थ आहे. माणसांच्या मनात आशा-निराशेचा खेळ अखंड सुरु असतो. आपण जसा विचार करतो त्याप्रमाणे आपली बुद्धी आणि कर्मेंद्रिये कार्य करीत असतात. म्हणून मनात नकारात्मक विचारांना स्थान देता कामा नये.
ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले की, नुकत्याच पार पडलेल्या पॅरालीम्पिक स्पर्धेत भारतीय दिव्यांग खेळाडूंच्या संघाने दैदिप्य मान यश मिळवले . जर आपल्यात शारीरिक अपंगत्व असेल तर धीर न सोडता सतत प्रयत्न केले तर , धड धाकट व्यक्तींपेक्षा दिव्यांग पुढे जाऊ शकतात हा मोठा संदेश ह्या निमित्ताने मिळाला आहे. दिव्यांगांच्या जीवन संघर्षात मदत करायला आधुनिक तंत्रज्ञान अनेक प्रकारे सहाय्य करू शकते. . संगणक, इंटरनेट, स्मार्टफोन्स, त्यांमधील ऍप्स व तत्सम सुविधा आणि ‘वेअरेबल्स’ ह्यांनी दिव्यांगांना अक्षरशः मदतीचा हात दिला आहे, तोही तुलनेने कमी खर्चात अधिक सोयी पुरवून. इलेक्ट्रॉनिक वस्तू अगदीच छोट्या आणि हलक्या असल्याने त्यांचा वापर करणे सहज बनले आहे.
