डॉ. नानासाहेब परुळेकर माध्यमिक विद्यालयच्या गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव

पुणे – प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वसतिगृहात राहून यश संपादन करणाऱ्या महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींचे खऱ्या अर्थाने कौतुक करणे आवश्यक असल्याचे मत ग्रीन तारा फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. मंदा मुने यांनी व्यक्त केले.
येरवडा येथील डॉ. नानासाहेब परुळेकर माध्यमिक विद्यालयातील दहावीतील गुणवंत विद्यार्थिनी त्यांचे पालक व शिक्षक यांचा ग्रीनतारा फाउंडेशन व निर्भय प्रतिषठाण ट्रस्ट यांच्यावतीने नुकताच गौरव करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. समाजात इच्छा असून देखील मुलींना शिकता येत नाही. काही ठिकाणी पालकच त्यांना घरी बसवतात तर काही ठिकाणी आर्थिक व सामाजिक परिस्थितीतून मुलींना शिकता येत नाही. अशा गंभीर परिस्थितीत महापालिकेच्या शाळेतील महापालिकेच्या शाळांमधील मुलींनी मिळवलेले हे यश अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.
यावेळी प्रशालेत पहिली आलेली वैष्णवी गोविंद केंगले (90.80), वैष्णवी विकास पाटील(89.80), साक्षी अनिल कदम(88.20), प्राची रवींद्र बदिरके (86.20) या चार विद्यार्थिनींचा यावेळी सत्कार करण्यात आला. वैष्णवी केंगले व साक्षी कदम यांनी येरवडा येथील बहुजन हिताय वसतिगृहात राहून वैष्णवी पाटील व प्राची बदिरके यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश संपादन केले आहे.
याप्रसंगी निर्भय प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल गायकवाड, प्रशालेचे मुख्याध्यापक विलासराव सुर्वे, वर्गशिक्षिका संगीता घुमटकर, रोहिणी दरेकर, कल्पना चव्हाण, नंदा बनसोडे, हनुमंत मोरमारे यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
वैष्णवी केंगले विद्यार्थिनी मूळची मंचरची असून तिचे वडील सुरक्षा रक्षकाचे काम करतात. कोणतीही खाजगी शिकवणी नसताना 90 टक्के गुण मिळवून ती शाळेत पहिली आली. भविष्यात जिल्हाधिकारी होण्याची इच्छा तिची इच्छा आहे.
वैष्णवी पाटील हि धानोरी येथे राहत असून आई-वडील मजुरीचे काम करतात. शिक्षकांचे मार्गदर्शन व प्रामाणिक कष्ट यांच्या जोरावर तिने हे यश संपादन केले असून तिला एनडीए मध्ये जाण्याची इच्छा तिने व्यक्त केली.
साक्षी कदम हिने आजारपणावर मात करीत वसतिगृहात राहून यश संपादन केले. तिचे वडील सुरक्षारक्षक तर आई खाजगी कंपनीत काम करते. वडिलांना पोलीस खात्यात जाण्याची इच्छा होती मात्र तीच इच्छा आता साक्षी आयपीएस अधिकारी होऊन पूर्ण करणार आहे.
प्राची बदिरके हि विश्रांतवाडी येथील माजी सैनिकनगर येथे राहण्यास आहे. वडील हॉटेलमध्ये काम करतात. तीन मुलींच्या शिक्षणाचा खर्च एकटया वडिलांवर अवलंबून आहे. लॉकडाऊन कालावधीत अनेक अडचणी आल्या तरीदेखील त्यावर मात करत कोणतीही खाजगी शिकवणी नसताना तिने हे यश संपादन केले.
त्यांना मार्गदर्शन करणारे वर्गशिक्षिका संगीता घुमटकर यांच्या पतीचे मागील वर्ष निधन झाले परंतु स्वतःच्या मुलांप्रमाणे सर्व मुलांना प्रशालेतील सर्व शिक्षक मार्गदर्शन करतात. विद्यार्थीनी देखील अत्यंत गुणी असून त्यांनी त्याचा प्रामाणिकपणे उपयोग केल्यामुळे त्यांना हे यश मिळाल्याचे समाधान त्यांच्या शिक्षकांनी व्यक्त केले.

Leave a Reply

%d bloggers like this: