Saturday, September 5, 2026
Latest NewsPUNE

आयुष्यात मोठे होण्याकरीता पैसा नव्हे शिक्षण महत्वाचे – दीपक पायगुडे यांचे मत

पुणे : आजच्या काळात मुलांच्या तब्येती थर्माकोलसारख्या झाल्या आहेत. मुलांना मानसिक व शारिरीकदृष्टया सशक्त करण्याकरीता मुला-मुलींच्या आईचे योगदान महत्वाचे आहे. कोणताही माणूस आयुष्यात मोठा होण्याकरिता पैसा नव्हे तर, त्याने घेतलेले शिक्षण महत्वाचे असल्याचे मत माजी आमदार व लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक पायगुडे यांनी व्यक्त केले.

गुरूवार पेठेतील प्रभात जन प्रतिष्ठान व सेवा सहयोग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार पेठेतील श्री नाकोडा भैरव जैन धर्मशाळा येथे आयोजित कार्यक्रमात शहराच्या पूर्व भागातील १०० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सेवा सहयोगचे इंद्रजित देशमुख, मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, कृष्णा परदेशी, दत्ता काळे, मंगेश शिंदे, ओंकार नाईक, हेमराज साळुंखे, मनोज शेलार, ओंकार निंबाळकर, अक्षय चौहान, कुणाल जगताप आदी उपस्थित होते.

दीपक पायगुडे म्हणाले, मन, मनगट आणि मेंदू बळकट असेल, तर आपण कोणत्याही संकटावर मात करु शकतो. समाजात समर्पण वृत्तीने काम करणा-या मंडळींची संख्या कमी झाली आहे. आजमितीस शिक्षणाचे महत्व पटवून देत समाजाच्या तळागाळात शिक्षण पोहोचविणे गरजेचे आहे. शिक्षणाने मुलांंमध्ये जिद्द व आत्मविश्वास निर्माण होईल.

महेश सूर्यवंशी म्हणाले, गणपती ही विद्येची देवता आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने गणरायाची उपासना करायला हवी. अर्थवशिर्ष व इतर श्लोकांचे पठक केल्यास वाच शुद्ध व बुद्धी तल्लख होण्यास मदत होईल. अशा श्लोकांची पुस्तके व शैक्षणिक साहित्य या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रभात जनप्रतिष्ठान उत्तमरितीने करीत आहे.

किशोर चव्हाण म्हणाले, मागील १० वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे. शहराचा पूर्व भाग हा शैक्षणिकदृष्टया मागासलेला आहे. त्यामुळे शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे, तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत मिळावी, या उद्देशाने प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांसाठी देखील विविध उपक्रम राबविले जातात, असेही त्यांनी सांगितले. मंगेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. कृष्णा परदेशी, निलेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading