आता युरोपातही रंगणार वसंतोत्सव
प्रथमच विदेशात आयोजन, चार शहरांमधील रसिकांना मिळणार शास्रीय संगीताची पर्वणी
पुणे : शास्रीय गायनाच्या माध्यमातून पुणेकरांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा गायक राहुल देशपांडे यांचा वसंतोत्सव आता युरोपातील नागरिकांवर आपली भुरळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या १८ ते २६ जून या कालावधीत युरोपातील चार शहरांमध्ये वसंतोत्सव रंगणार असून, भारताबाहेर प्रथमच युरोप येथे वसंतोत्सवाचे आयोजन होत आहे.
वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान आणि फॅकल्टी ऑफ लिबरल आर्ट्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने युरोपात हा वसंतोत्सव आयोजित करण्यात आला आहे. १८ जून रोजी जर्मनी येथील बर्लिन शहरात, १९ जून रोजी जर्मनीतील म्युनिच शहरात, २५ जून रोजी स्वित्झर्लंड येथील झ्युरिक शहरात तर २६ जून रोजी नेदरलँडमधील द हेग शहरात हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी गायक राहुल देशपांडे यांचे गायन होईल. त्यांना तबल्यासाठी निखील पाठक, हार्मोनियामासाठी मिलिंद कुलकर्णी आणि पखवाजसाठी प्रसाद जोशी हे साथ करतील.
युरोपातील वसंतोत्सवाच्या आयोजनासाठी महाराष्ट्र मंडळ म्युनिच, मराठी मित्र बर्लिन, हिर्ष ट्रेंडसेटर झ्युरिक आणि मराठी मंडळ नेदरलँड यांचे सहकार्य लाभले. तर कोटीभास्कर ग्रुप, लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड, सुहाना मसाले अँड ऑर्लीकॉन बाल्झर्स यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
