fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

आंतरराष्ट्रीय पातळीवरील मागणी विचारत घेवून पिकांचे वाण विकसित करा- कृषी मंत्री दादाजी भुसे

पुणे : कृषी क्षेत्राचे भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील मागणी विचारत घेत पिकांचे वाण विकसित करण्याची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या १०७ व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. बैठकीला उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, राज्यपाल नियुक्त सदस्य कृष्णा लव्हेकर, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. धर्मराज गोखले, कृषी परिषदेचे अशासकीय सदस्य मोरेश्वर वानखेडे, अर्चना पानसरे, महासंचालक रावसाहेब भागडे आदी उपस्थित होते.

कृषी मंत्री भुसे म्हणाले, कृषी विद्यापीठातून विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शिक्षण रोजगारांच्या संधी उपलब्ध करुण देणारे असावे. त्यादृष्टीने अभ्यासक्रमाची आखणी करण्यात यावी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण पर्यटन प्रकल्प, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रकिया उद्योग योजना अशा विविध शासकीय योजनांचा लाभ देवून आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नवनवीन संशोधन करुन कृषी विद्यापीठाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे. ‘विकेल ते पिकेल’ अभियानानुसार बाजाराच्या मागणीप्रमाणे पीक पद्धती विकसित करावी. तसेच भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन स्थानिक पीक पद्धती विकसित करण्यसाठी काम करावे. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी त्याबाबत संशोधन करुन सेंद्रिय प्रमाणीकरण अभ्यासक्रम प्रायोगिक तत्वावर सुरु करावे, असेही भुसे यांनी सांगितले.

संत्रा व मोसंबी या फळापासून निर्मिती होणारे ज्यूस जास्त काळ कसे टिकवून ठेवता येईल याबाबत संशोधन करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार पद्धतीचे रोप उपलब्ध करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. आज पर्यंत एकूण २८ वाणांना भौगोलिक मानांकन मिळाले असून त्यामध्ये आणखीन वाढ करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. भौगोलिक मानांकन मिळालेल्या वाणांचे जतन व संवर्धन करावे.

माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती १ जुलै रोजी कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून गावपातळीपर्यंत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहेत. तसेच कृषी सप्ताह साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

कृषी विभागाच्यावतीने मान्सूनचा अंदाज घेवून शेतकऱ्यांना वेळोवेळी पेरणीबाबत मार्गदर्शन करावे. पुरेशा प्रमाणात पाऊस पडल्याशिवाय पेरणी न करण्याबाबत कृषी विभागाच्या मदतीने आपल्यास्तरावरुन आवाहन करावे. बियाणे, रासायनिक खते, निविष्ठाबाबत वेळोवेळी आढावा घेवून त्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. आपल्याला याबाबत कुठेही गैरप्रकार आढळून आल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी, असे भुसे यांनी सांगितले.

राज्यात सोयाबीन व कापूस या पिकांची ६० टक्के क्षेत्रात लागवड केली जाते. या पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी उत्तम मॉडेल तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शेतकरी केंद्रबिंदू मानून त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कृषी विभाग काम करीत आहे. एकूणच शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनस्तरावरुन विविध प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शिक्षण विभागाचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, विस्तार शिक्षण व साधन सामुग्री विकास विभागाचे संचालक विठ्ठल शिर्के, प्रशासन विभागाचे सहसंचालक सुभाष बोरकर, वित्त विभागाच्या सहसंचालक अस्मिता बाजी,  कृषी विद्यापिठे सेवा प्रवेश मंडळाचे प्राध्यापक डॉ. नितीन गोखले यांनी संबंधित विषयाचे सादरीकरण केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading