जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडून चांदीचे सिंहासन अर्पण
पिंपरी : जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आमदार अण्णा बनसोडे यांनी चांदीचे सिंहासन, अभिषेक पात्र, मखर व पुजा साहित्य असे एकूण २१ किलो चांदीचे साहित्य तयार करून घेतलेले असुन ते १८ जून रोजी देहू संस्थांनकडे अर्पण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या सिंहासनाचे पिंपरी चिंचवड मधील भक्त भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी शनिवारी ( दि. १८ जून) सिंहासनाची मिरवणूक व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या नंतर सोमवारी (दि. २० जून ) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देहू येथे सिंहासन आणि इतर साहित्य देवस्थानला अर्पण करण्यात येणार आहे .
गुरुवारी, (दि.१६ जून) चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार विलास लांडे, श्री क्षेत्र देहू संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. नितीन महाराज मोरे, संजय महाराज मोरे, ह. भ. प. पुंडलिक महाराज मोरे, ह. भ. प. भानुदास महाराज मोरे, ह. भ. प. संतोष महाराज मोरे, ह. भ. प. शेखर कुटे, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी तसेच सुरेश गारगोटे, सारिका पवार, संजय अवसरमल आदी उपस्थित होते. जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या अभिषेकासाठी लागणारे सिंहासन व साहित्याची भव्य दिंडी मिरवणूक शनिवारी सकाळी ९ वा. आकुर्डी विठ्ठल मंदिरापासून आमदार अण्णा बनसोडे यांचे नवीन जनसंपर्क कार्यालय, काळभोर नगर, चिंचवड येथ पर्यंत काढण्यात येणार आहे. यावेळी पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर, ह.भ.प. चैतन्य महाराज देगुलकर व श्री क्षेत्र देहू संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. नितीन महाराज मोरे यांच्यासह राज्यातील नामांकित कीर्तनकार, प्रबोधनकार,समस्त वारकरी संप्रदाय व शहरातील भजनी मंडळी व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन आ. अण्णा बनसोडे यांनी केले.
