‘स्वरमल्हार’ कार्यक्रमातून रसिकांना मिळणार व्हायोलीन वादनाचा आनंद
पुणे : व्हायोलिन अकॅडमी आणि ऑर्लीकॉन बाल्झर्स यांच्या संयुक्त विद्यमाने २ व ३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता गणेश कला, क्रीडा रंगमंच येथे सातव्या ‘स्वरमल्हार’ महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा व्हायोलिन अकॅडमीचे संस्थापक पं. अतुलकुमार उपाध्ये यांनी आज प्रभात रस्त्यावरील सीसी अँड कंपनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान केली. यावेळी स्वरझंकार, स्वर मल्हार,स्वरमैफिल आणि स्वर दिपावली या महोत्सवांचे आयोजक तेजस व राजस उपाध्ये उपस्थित होते.
पं. अतुलकुमार उपाध्ये म्हणाले, “१९५१ साली स्थापना झालेल्या व्हायोलीन विद्यालयाला यंदा ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचबरोबर या विद्यालयाची स्थापना करणारे माझे वडील स्व. बाळकृष्ण शंकर उपाध्ये यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष असा, दुहेरी योग साधून हे वर्ष आम्ही व्हायोलीनचे वर्ष म्हणून साजरे करणार आहोत. त्यानिमित्ताने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार असून, त्याची सुरवात येत्या २ व ३ जुलै रोजी होणाऱ्या ‘स्वरमल्हार’ या कार्यक्रमाद्वारे होणार आहे.”
पं. उपाध्ये पुढे म्हणाले, “ व्हायोलीन’चा इतिहास ७०० वर्षांचा आहे. साधारण २०० वर्षांपूर्वी व्हायोलीन हे भारतात पहिल्यांदा कर्नाटक आणि गोवा येथे आले आणि शंभर वर्षांपूर्वी ते उत्तर हिंदुस्थानी संगीतात आले. त्यामुळे ७० वर्षांपूर्वीचा काळ पाहिला तर, व्हायोलिनला संगीत क्षेत्रात येऊन ३० वर्षे झाली होती आणि त्यामध्ये निरनिराळ्या शैलींचा समावेश कसा करता येईल, यावर अभ्यास करण्यासाठी एक संशोधन आणि विकास केंद्र असावे, या हेतूने वडिलांनी श्रीधर पार्सेकर यांच्या वादनातून प्रोत्साहन घेऊन, डॉ. यहुदी मनुहीन यांचे तांत्रिक सहयोग घेत, भास्कर बुवा बखले यांच्या गायकीच्या बैठका घेऊन यावर काम करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या याच प्रयत्नांना हळू हळू यश मिळत गेले आणि संस्थेने प्रशिक्षित केलेल्या युवा व्हायोलीन वादकांना पुरस्कार मिळू लागले. गेल्या ७० वर्षांत विद्यालयाने प्रशिक्षित केलेल्या ७ युवा व्हायोलीन वादकांना राष्ट्रपती पदक मिळाले आहे.’’
स्वरमल्हार महोत्सावात सादर होणाऱ्या कार्यक्रमाबाबत महिती देताना पं. उपाध्ये म्हणाले, “ महोत्सवाची सुरवात २ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजाता स्व. बाळकृष्ण उपाध्ये यांचे नातू तेजस व राजस उपाध्ये यांच्या पार्सेकर शैलीतील व्हायोलीन जुगलबंदीने होईल. त्यानंतर व्हायोलीनमध्ये आपली वेगळी शैली विकसित केलेल्या एन राजम यांच्या कन्या संगीता शंकरन आणि त्यांच्या दोन कन्या नंदिनी व रागिणी यांच्या व्हायोलीन वादनाचा आस्वाद रसिकांना घेता येईल. पहिल्या दिवसाचा समारोप प्रसिद्ध गझल गायक जगजीत सिंग यांना कायम साथ करणारे सुप्रसिद्ध व्हायोलीन वादक दीपक पंडित यांच्या ‘ सिम्फनी ऑफ व्हायोलीन’ या आगळ्या वेगळ्या ऑर्केस्ट्राच्या सादरीकरणाने होणार आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचे गायन त्यानंतर ईटावा (इमादखानी) घराण्याचे प्रसिद्ध सतारवादक व उस्ताद विलायत खान यांचे सुपुत्र उस्ताद शुजात हुसैन यांचे सतारवादन होईल. दुसऱ्या दिवसाचा समारोप पं. अतुलकुमार उपाध्ये यांच्या व्हायोलीन ऑर्केस्ट्राने होईल.”
जन्मशताब्दी वर्षानिमित्त होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देताना पं. उपाध्ये म्हणाले, “ पं. बाळकृष्ण उपाध्ये यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यंदा व्हायोलीन क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या विविध कलाकारांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. त्याचबरोबर संस्थेतर्फे दरवर्षी दिला जाणारा पं. बाळकृष्ण उपाध्ये यांच्या स्मृतीनिमित्त देण्यात येणारा पुरस्कार आणि दाजीकाका गाडगीळ रसिकाग्रणी पुरस्कारही यंदा दिला जाणार आहे. संस्थेतून व्हायोलीन शिकलेल्या नामांकित कलाकारांचे कार्यक्रम, उदयोन्मुख कलाकारांसाठीचा ‘रायझिंग स्टार’ कार्यक्रम, कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम, व्हायोलीन आणि विविध वाद्यांची जुगलबंदी कार्यक्रम, व्हायोलीन अकॅडमीच्या अद्ययावत संशोधन केंद्राच्या कामाची सुरवात असे विविध कार्यक्रम होणार आहेत.’’
