पुण्यातील १०१ गणेशोत्सव मंडळांंनी साजरा केला शिवस्वराज्य दिन
पुणे : तब्बल १०१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन सार्वजनिक शिवस्वराज्य दिन म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन साजरा केला. प्रत्येक मंडळाशी निगडीत असलेले कार्यकर्ते, बालचमू, महिला, आबालवृध्द आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला, अशी माहिती गणेशोत्सव मंडळ तिथे शिवस्वराज्य दिन सोहळ्याचे प्रवर्तक तसेच शिवजयंती महोत्सव समितीचे आद्यप्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.
छत्रपती राजाराम मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर, साईनाथ मंडळाचे पियुष शहा, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, शनी मारुती बाल गणेश मंडळाचे सचिन पवार, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, भैरवनाथ मंडळाचे सागर पवार यांनी यात महत्वाची भूमिका बजावली. नवज्योत मंडळ, वाघजाई मंडळ, कानिफनाथ मंडळ, एकता मंडळ, विधायक मंडळ,ओंकार मंडळ, त्रिशूंड गणपती, विजय मंडळ, पंचतानेश्वर मंडळ, बाल तरुण मंडळ, भुलेश्वर मंडळ यासह पुण्यातील १०१ मंडळांनी हा सोहळा उस्फुर्तपणे साजरा केला.
अमित गायकवाड म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन विश्वव्यापी करण्यासाठी समितीच्या माध्यमातुन सन २०१३ पासून शिवराज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन म्हणून महाराष्ट्र शासनाने जाहीर करावा आणि शिवरायांच्या जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, वाघनखे, शिवमुद्रा या पंच स्वराज्य चिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्यध्वजा सह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन साजरा करावा, असे महाराष्ट्र शासनाला आवाहन करण्यात आले होते.
शासन स्तरावर केलेल्या पाठपुराव्याला सन २०२१ साली महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास खात्याने आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासकिय परिपत्रक काढून शासन मान्यता देऊन महाराषट्र भर साजरा करण्यास सुरुवात केली. यावर्षी १०१ गणेशोत्सव मंडळांनी शिवस्वराज्य दिन स्वराज्यगुढी उभारुन साजरा केला. भविष्यात महाराष्ट्रातीलच नव्हेतर विश्व भरातील गणेशोत्सव मंडळे यात सहभागी करुन हा दिवस विश्वव्यापी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
