‘कार्त दे विझीत’ मधून उलगडले जगभरातील १२० नामवंतांचे चित्र-चरित्र
पुणे : पंडित जसराज यांचे गायन करताना साकारलेले चित्र…सचिन तेंडुलकर यांचे बारकाईने टिपलेले स्मितहास्य…अभिनेत्री नूतन यांच्या चेहऱ्यावरील सौंदर्य छटा…ऋषी कपूर यांचे भुरळ पाडणारे मोहक हास्य…पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरी वाजवताना तल्लीन झालेले विलोभनीय चित्र… असे भारतासह जगविख्यात असलेल्या प्रतिभावंत मानवी चेहरे चारकोल पोट्रेट मध्ये पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली.
चित्रकार शुभदा सहस्रबुद्धे यांचे ‘कार्त दे विझीत’ या पोट्रेट चित्रप्रदर्शनाचे आयोजन भांडारकर रस्त्यावरील आर्ट टू डे आर्ट गॅलरी येथे करण्यात आले आहे. चारकोल पेपरवरील पोट्रेट चित्रांचे हे प्रदर्शन असून चित्रकार शुभदा सहस्रबुद्धे यांनी कोरोना काळात अमेरिकेमध्ये वास्तव्यास असताना ‘स्केच अ डे’ या संकल्पनेतून १४० दिवस सलग ही चित्रे काढली आहेत.
प्रदर्शनात लक्ष्मणराव किर्लोस्कर, जे आर डी टाटा, स्टीव्ह जॉब्स, रवींद्रनाथ टागोर यांसह शास्त्रीय गायक, स्वातंत्र्यसैनिक, क्रीडा क्षेत्रातील दिग्गज, शास्त्रज्ञ, देशविदेशातील सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आदी क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तिमत्व चित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांसारख्या क्रांतिवीरांची चित्रे रसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. चेह -याच्या शरीररचनेचे बारीकसारीक बारकावे, आकार, चेहऱ्यावरील भाव, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य, केस आणि त्वचा वेगवेगळ्या जातीधर्माच्या लोकांच्या चेह-याची रचना याचा अभ्यास करून त्यांनी चित्रे साकारली आहेत.
आॅटिझम रिसर्च अँड टेÑनिंग सेंटरमधील मुले, पालक, शिक्षक, विश्वस्त यांनी देखील या प्रदर्शनाला भेट दिली आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून आॅटिझम बद्दल जनजागृती देखील करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी ही चित्रे काढली असून चित्रांसोबतचा त्या व्यक्तीची माहिती देखील सोशल माध्यमांवर टाकली होती. त्यामुळे परदेशातील अनेकांना भारतातीलच नव्हे तर जगभरातील नामवंतांची माहिती जाणून घेता आली. लॉकडाऊन चा असा सदुपयोग करून प्रत्येकाने सकारात्मक रहावे, असे त्यांनी सांगितले. रविवार, दिनांक १२ जून पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ यावेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.
फोटो ओळ : चित्रकार शुभदा सहस्रबुद्धे यांचे ‘कार्त दे विझीत’ या पोट्रेट चित्रप्रदर्शनाचे आयोजन भांडारकर रस्त्यावरील आर्ट टू डे आर्ट गॅलरी येथे करण्यात आले आहे. रविवार, दिनांक १२ जून पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ यावेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.
