fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कोऱ्हाळे बु. येथील शेतकरी अजित पोमणे यांनी कलिंगडातून घेतले लाखाचे उत्पन्न

बारामती : बाजारात मागणी असलेला शेतमाल आपल्या शेतात पिकवावा या संकल्पनेतून मौजे कोऱ्हाळे बु. येथील शेतकरी अजित पोमणे यांनी  श्री सिद्धीविनायक हायटेक रोपवाटिका आणि शेडनेट हाऊसची उभारणी केली आहे. त्यातून ते  परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची  रोपे,  फळे  उपलब्ध करुन देत त्यांनी उत्पन्न वाढविले आहे. सोबत उन्हाळ्यात कलिंगडाच्या शेतीच्या माध्यमातूनही साडेतीन लाखाचे उत्पन्न मिळविले.

पोमणे यांनी 2012 पासून शेतात नव्या तंत्राचा वापर करण्यास सुरूवात केली. ज्वारी, बाजरी  व गहू या पिकातून 18 एकरच्या शेतात मिळणारे अल्प उत्पन्न लक्षात घेता त्यांनी बागायती शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. शेतात ऊस, कलिंगड, कांदा, वांगी, टोमॅटो ही नगदी पिके घेऊ लागले. भाजीपाला पिकांपासून चांगला आर्थिक फायदा होऊ लागला. परंतु भाजीपाला रोपे लागवडीसाठी रोप खरेदीवर मोठ्या प्रमाणावर खर्च होऊ लागला. यामुळे स्वतःचीच रोपवाटिका उभी करण्याचा निर्णय अजित पोमणे  यांनी घेतला.

मागील वर्षी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून 10 गुंठे क्षेत्रावर अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेअंतर्गत श्री सिद्धीविनायक हायटेक रोपवाटिका स्थापन केली. रोपवाटिकेसाठी भाजीपाला रोपे विक्रीचा परवाना घेतला. रोपवाटिकेसाठी जवळपास 15 ते 16 लाख रुपये खर्च आला.  शासनाच्या कृषी विभागाकडून यासाठी 7  लाख 10 हजार रुपये  अनुदान प्राप्त झाले. रोपवाटिकेमध्ये कलिंगड, खरबूज, वांगी,  मिरची, टोमॅटो, शेवगा व ऊसाच्या रोपांची निर्मिती केली जाते.

ग्राहकांची गरज ओळखून परिश्रमपूर्वक नवा मार्ग स्विकारल्याने पोमणे हे शेती व्यवसायात यशस्वी ठरले आहे. ‘विकेल ते पिकेल’ सोबतच ‘नव्या तंत्राने पिकेल’ ही संकल्पनादेखील शेतात राबविल्याने त्यांची वाटचाल आर्थिक समृद्धीकडे सुरू आहे.

पोमणे  हे कलिंगडाची  विक्री ते  बांधावर करत असून  प्रति वर्ष  त्यांना कलिंगडापासून 3 ते साडे तीन लाख रुपये उत्पन्न भेटते.  यावर्षी  कलिंगडामधून त्यांना खर्च वजा जाऊन 3 लाख 20 हजार रुपये मिळाले. मागील वर्षी भाज्यांच्या रोपांतून 6 लाख रुपये भेटले तर 4 लाख 50 हजार ऊसाची  रोपे विक्रीकरुन 11 लाख 25 हजार रुपये मिळाले. त्यातून  खर्च वजा जाऊन त्यांना 4 लाख 50 हजार रुपयांचा नफा झाला.

अजित पोमणे, शेतकरी-कृषि विभागाकडून रोपवाटिकेला आणि शेडनेटसाठी अनुदान प्राप्त झाले त्यामुळे हायटेक रोपवाटिकेची निर्मिती करु शकलो.  शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन कृषि विभागाकडून मिळू लागल्याने चांगल्या दर्जाची रोपे तयार करु शकलो.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading