Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

भारत रत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवात गायन, वादन, नृत्याची पर्वणी

पुणे : कलाश्री संगीत मंडळा आणि द औंध सोशल फौंउडेशनचे अध्यक्ष अभिजीत गायकवाड यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने  ‘९ व्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ११ ते १३ जून या कालावधीत औंध येथील पंडित भीमसेन जोशी कलामंदिर येथे दररोज सायंकाळी पाच वाजता होईल.  या तीन दिवसीय महोत्सवाचे उदघाटन शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असेल.

महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची (११ जून) सुरवात मानसी कुलकर्णी यांच्या गायनाने होईल. त्यांना तबला साथ निलेश रणदिवे यांची असेल. त्यानंतर यज्ञेश रायकर यांचे व्हायोलीन वादन होईल. त्यांना तबला साथ पांडूरंग पवार देतील. पहिल्या दिवसाची सांगता पंडित श्रीनिवास जोशी यांच्या गायनाने होईल. त्यांना संवादिनी साथ गंगाधर शिंदे  आणि तबला साथ किशोर कोरडे हे देतील.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची (१२जून) सुरवात कलाश्री संगीत मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या गायन व वादनाने होणार आहे. त्यानंतर यशस्वी सरपोतदार यांचे गायन होईल. त्यांना संवादिनीवर साथ उमेश पुरोहित आणि तबला साथ निलेश रणदिवे देतील. त्यानंतर पंडित अविराज तायडे यांचे गायन होईल. त्यांना संवादिनी साथ प्रभाकर पांडव आणि तबला साथ पंडित मुकुंदराज देव यांची असेल. या दिवसाचा समारोप डॉ. पूर्वा शहा यांच्या कथक नृत्याने होईल.

महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी (१३ जून ) पंडित हेमंत पेंडसे यांचे गायन होईल. त्यांना उदय कुलकर्णी  हे संवादिनीसाठी तर तबल्यासाठी प्रणव गुरव हे साथ देतील. त्यानंतर नंदकिशोर ढोरे यांचे तबलावादन होईल. त्यांना संवादिनी साथ गंगाधर शिंदे देतील. महोत्सवाची सांगता पंडित डॉ. विकास कशाळकर यांच्या गायनाने होणार आहे. त्यांना संवादिनीसाथ प्रवीण कासालीकार आणि तबला साथ प्रशांत पांडव यांची असेल.

महोत्सावाच्या शेवटच्या दिवशी अकोला येथील शास्त्रीय गायक डॉ. किशोर देशमुख यांना पंडित भीमसेन जोशी पुरस्कार प्रदान केला जाईल. दहा हजार रुपये रोख, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading