fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाची सुरेल सुरुवात

पुणे – प्रतिथयश युवा कलाकारांनी सादर केलेल्या ‘देवा घरचे ज्ञात कुणाला’, ‘विलोपले मधुमिलनात या’, ‘गुंतता हृदय हे’, ‘ऋतुराज आज वनी आला’, ‘धीर धरी’ अशा वैविध्यपूर्ण आणि अविट गोडीच्या नाट्यपदांना रसिकांनी भरभरून दाद दिली. निमित्त होते ते सृजन फाउंडेशन, नांदेड सिटी आयोजित ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे! महोत्सवात ज्येष्ठ रसिकांसह युवा वर्गाची उपस्थिती लक्षणीय ठरली, हे महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य!
गायन-वादनाचा मिलाफ असलेल्या या दोन दिवसीय स्वरोत्सवास आज (दि. 4 जून) टिळक स्मारक मंदिर येथे सुरुवात झाली. शास्त्रीय, सुगम तसेच नाट्यसंगीतातील प्रतिथयश गायक आणि प्रतिभावान युवा कलाकारांना ऐकण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळाली आहे. महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे यांच्या हस्ते झाले.

तरंगिणी प्रतिष्ठानचे पं. शौनक अभिषेकी, ज्योत्स्ना भोळे यांच्या कन्या वंदना खांडेकर, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पायगुडे, विश्वस्त अधीश पायगुडे, कार्याध्यक्ष पोपटलाल शिंगवी, कोषाध्यक्ष रामचंद्र शेटे यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. स्वरोत्सवाचे यंदाचे 12वे वर्ष आहे.
सृजन फाउंडेशनतर्फे प्रत्येकी 15 हजार रुपयांची शिष्यवृत्ती गायिका रागिणी देवळे आणि तबलावादक गीत इनामदार यांना उद्योजक प्रकाश धोका यांच्या हस्ते या प्रसंगी प्रदान करण्यात आली.
‘नमन नटवरा’ या नांदीने स्वरोत्सवास सुरुवात झाली. ‘अमृताहुनी गोड’, ‘राम रंगी रंगले’, ‘मधुकर वन वन’, ‘बसंत की बहार आयी’, ‘सूरत पिया की’, ‘म्हातारा इतुका’ अशी एकाहून एक लोकप्रिय नाट्यपदे सावनी दातार-कुलकर्णी, श्रीरंग भावे आणि विश्वजित मेस्त्री यांनी सादर केली. ज्योत्स्ना भोळे, पंडित जितेंद्र अभिषेकी अशा दिग्गज कलाकारांच्या गायकीची रसिकांना आवर्जून आठवण झाली. कलाकारांना उदय कुलकर्णी (ऑर्गन), प्रशांत पांडव (तबला), माउली टाकळकर (टाळ), ज्ञानेश्वर दुधाणे (पखवाज) यांनी साथसंगत केली. संगीत नाटक, कलाकारांविषयी संदर्भ देत रवींद्र खरे यांनी समर्पक सूत्रसंचलन केले. कलाकारांचा सत्कार प्रसिद्ध शास्त्रीय गायक, संगीतकार पंडित हेमंत पेंडसे, गांधर्व महाविद्यालयाचे उपाध्यक्ष पांडुरंग मुखडे यांनी केला.
असरदार गायन, आवजावरील हुकुमत, उत्तम दमसास, सूक्ष्म सांगितिक जाण, प्रभावी तानक्रिया तसेच शास्त्र आणि भाव यांचा सुंदर मेळ म्हणजे ज्योत्स्नाबाई. त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात या हेतूने स्वरोत्सवाचे आयोजन केले जात असल्याचे प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना अनुराधा मराठे यांनी ज्योत्स्ना भोळे यांच्या आठवणींना उजाळा दिला. उपशास्त्रीय गायनाबद्दल राज्य शासनातर्फे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पंडित शौनक अभिषेकी यांचा सत्कार अनुराधा मराठे यांच्या हस्ते करण्यात आला. तर अनुराधा मराठे यांचा सत्कार वंदना खांडेकर यांनी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading