fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

नऱ्हे येथील नागरी समस्यांसाठी राष्ट्रवादीचे भूपेंद्र मोरे यांचे आमरण उपोषण

पुणे : नऱ्हे, आंबेगाव ही गावे पालिका हद्दीत समाविष्ट झाली आहेत. मात्र, येथील स्थानिक नागरिक अजून देखील मूलभूत नागरी सुविधांसाठी झगडत असताना महानगरपालिका प्रशासन अजूनही आपली उदासीनता सोडण्यास तयार नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांचे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनाकडून कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे प्रशासनाचा ढिम्म कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळत आहे.

महानगरपालिकेच्या घटनेनुसार व मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या भागात पिण्याच्या व सांडपाण्याची व्यवस्था नाही त्या ठिकाणी मोफत पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरची तातडीने व्यवस्था करावी. सध्या नऱ्हे परिसरात पालिकेची कोणतीच पाणी पुरवठा करणारी सक्षम यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे दररोज ३०० टँकर पाण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने सुमारे ३०० टँकरची मोफत व्यवस्था करावी हि प्रमुख मागणी जोर धरत आहे.

नऱ्हे, आंबेगाव भागात कचरा समस्या मोठी असून अनेकदा कचरा रस्त्यावरच पडलेला असतो. ग्रामपंचायत असताना खाजगी कचरावेचक कंत्राटदार ३० ते ४० रुपयांमध्ये कचरा संकलन करत असतं मात्र, सध्या दिलेल्या कंत्राटनुसार प्रत्येक घराला सुमारे ८० रुपयांची वसुली केली जात आहे, हे तातडीने थांबविण्यात येवून जुन्याच कंत्राटदाराला ग्रामपंचायत दरानेच कचरा संकलन करण्याची परवानगी द्यावी.

या भागातील रस्त्यांची देखील दुरवस्था झाली असून यात प्रामुख्याने कुमार ओंकार, प्रज्वल अशा सोसायट्यांसाठी रस्त्याच्या समस्येबाबत तातडीने उपाय योजना करण्यात याव्यात. तसेच गुंठेवारी बाबत दंडामध्ये सवलत देवून प्रशासनाने टाकलेल्या जाचक अटींबाबत चर्चा करणे करून त्यावर योग्य तो तोडगा काढणे अपेक्षित आहे. नाले सफाई अर्धवट स्थितीमध्ये आहे त्यामुळे या परिसरात डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत असून यामुळे मलेरिया सारख्या गंभीर आजाराची लागण होऊ शकते त्यामुळे तातडीने सर्व नाले साफ करण्यात यावेत.

समाविष्ट गावामध्ये मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत महानगरपालिकेने शासनाच्या २० टक्के दराने कर वसुली करावी. कोणत्याही सुविधा या भागात उपलब्धता नसताना देखील अशा प्रकारे कराचे संकलन करणे जाचक असल्याचे मोरे यांनी नमूद केले.

अनेक ठिकाणी, पथदिवे उपलब्ध नाहीत किंवा बंद स्थितीत आहेत, त्या सर्व तातडीने सुरू करण्यात यावेत, जेणेकरून अनेक अपघात टाळता येवू शकतील. भटक्या कुत्र्यांची समस्या देखील सातत्याने वाढत असल्याने त्यावर देखील उपाय योजना पालिकेच्या वतीने करण्यात याव्यात. वरील सर्व नागरिकांच्या हक्काचे मूलभूत सुविधा पालिकेने तात्काळ सोडवावेत. जो पर्यंत प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण असेच सुरु राहील अशी माहिती भूपेंद्र मोरे यांनी दिली.


आमरण उपोषणास विविध क्षेत्रातुन वाढता पाठिंबा

अनेकदा पाठपुरावा करून देखील प्रशासन आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत नसल्याने यापूर्वी देखील अनेकदा आंदोलनाच्या, निवेदनाच्या माध्यमातून नऱ्हे, आंबेगाव येथील नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या होत्या. यावेळी भूपेंद्र मोरे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला परिसरातील स्थानिक नागरिक, सोसायट्या, समाजसेवक, उद्योजक, यांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. त्याबरोबरीने दुसऱ्या दिवसापर्यंत सुमारे ५० पेक्षा जास्त रहिवासी सोसायटीनी आपल्या समस्यांचे पत्र भूपेंद्र मोरे यांना दिले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading