देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये महाराष्ट्र आणि पुण्याचे महत्त्वाचे योगदान – राष्ट्रपती राम नाथ कोविंद
पुणे : महाराष्ट्र आणि पुण्याचे देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच राजकीय विकासामध्ये महत्वाचे योगदान असून यापुढेही महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील, असा विश्वास राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी व्यक्त केला.
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त ॲड. शिवराज कदम जहागिरदार उपस्थित होते.
राष्ट्रपती कोविंद म्हणाले, महाराष्ट्र मध्यकाळापासूनच अग्रेसर राहिला आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, रामदास स्वामी आदींनी देशाचे आध्यात्मिक जीवन समृद्ध केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली स्वराज्याची स्थापना किंवा मराठी सरदारांची अटकेपार स्वारी, याद्वारे विविधतेमध्ये एकतेचे अद्भुत उदाहरण मराठा सरदारांनी प्रस्तूत केले होते. सामाजिक कामातही महाराष्ट्राने आघाडीची भूमिका बजावली. देशात स्थापन केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या संस्थापक सावित्रीबाई फुले, देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांनी या भूमीला पावन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच भूमितून शोषित, वंचितांच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण मानवतेसाठी कार्य केले आणि ते एक आदरणीय व्यक्तीमत्व ठरले, असेही कोविंद यांनी नमूद केले.
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील म्हणाल्या, स्व. दगडूशेठ आणि लक्ष्मीबाई हलवाई हे परोपकारी आणि सधन दांपत्य होते. स्वातंत्र्यचळवळीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून अनेक महत्त्वाच्या बैठका त्यांच्या हवेलीमध्ये होत असत. त्यांनी स्थापन केलेले गणपती मंदिर प्रसिद्ध झाले असून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. मंदिर ट्रस्टमार्फत ससून रुग्णालयातील रुग्णांसाठी मोफत जेवण आदी अनेक समाजउपयोगी कार्ये केली जातात असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू ले. जन. डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त), डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू आणि राईज अँड शाईन बायोटेक प्रा. लि. च्या अध्यक्षा व कार्यकारी संचालक डॉ. भाग्यश्री पी. पाटील, बोन्साय कला आणि पर्यावरण जागृती विषयात पहिली डॉक्टरेट केलेल्या डॉ. प्राजक्ता काळे यांना लक्ष्मीबाई पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
