आत्मनिर्भर भारतात सोसायटींचा स्वयंपुनर्विकास ही काळाची गरज -चंद्रशेखर प्रभू

पुणे:आपला समाज आणि देश झपाट्याने बदलतो आहे. आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करतो आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारतात सोसायटींचा स्वयंपुनर्विकास ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध वास्तू विशारद चंद्रशेखर प्रभू यांनी केले. तसेच चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडच्या विकासाच्या संकल्पाला साथ देण्यासाठी कोथरूड मधील सोसायटींना पुनर्विकास करायचा असेल, तर त्यांना मोफत मार्गदर्शन करणार असल्याची घोषणा ही त्यांनी यावेळी केली.

कोथरूड मधील सर्व सोसायटी आणि अपार्टमेंट मधील नागरिकांच्या कायदेविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने सर्व सोसायटी आणि अपार्टमेंट मधील रहिवाशांचे एकत्रिकरण करुन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रशेखर प्रभू बोलत होते.

या कार्यक्रमास भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ‌ चंद्रकांत पाटील, पुण्याचे खासदार गिरीश बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, सहकार विभागाचे माजी आयुक्त चंद्रकांत दळवी, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, अॅड. मिताली सावळेकर, मोहना नातू यांच्या सह भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि कोथरुडमधील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

चंद्रशेखर प्रभू म्हणाले की, आज पुनर्विकासापेक्षा स्वयंपुनर्विकास अतिशय गरजेचं आहे. कारण बिल्डरच्या माध्यमातून सोसायट्यांचा पुनर्विकास होताना, नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. त्यामुळे सोसायटीच्या रहिवाशांवी पुनर्विकासाऐवजी स्वयंपुनर्विकासाकडे वळले पाहिजे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा मंत्र दिला आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारतात सोसायटींचा स्वयंपुनर्विकास ही काळाची गरज आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, मुंबईत अनेक सोसायट्यांना स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून स्वतःच स्वतःचा विकास करुन घेत आहेत. पुण्यात ही विशेष करुन कोथरुड मध्येही अनेक सोसायट्या पुनर्विकासाच्या टप्प्यावर आहेत‌. त्यामुळे त्यांनी पुनर्विकासाऐवजी स्वयंपुनर्विकासाकडे वळले पाहिजे. यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यशाळेच्या माध्यमातून क्रांतीकारी पाऊल पुढे टाकले आहे. कोथरुडच्या विकासाच्या त्यांच्या संकल्पाला साथ म्हणून कोथरूड मधील कोथरूड मधील सोसायटींना पुनर्विकास करायचा असेल, तर त्यांना मोफत मार्गदर्शन करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले की, आज पुण्यातील अनेक सोसायट्या पुनर्विकासासाठी प्रयत्नशील आहेत. पण बहुतांश सोसायट्यांचे डिम कन्व्हेयन्स झाले नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बिल्डरकडून सोसायट्यांची स्थापना करुन घेऊन डिम्ड कन्व्हेयन्ससाठी प्रयत्न करावेत.

ते पुढे म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळाच्या अखेरिस वर्ग २ च्या जमिनी एक करण्याचा निर्णय झाला होता. यासाठी तीन वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. पण याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे याला पुन्हा तीन वर्षांची मुदतवाढ मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, माझ्या कोथरुड मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून प्रॉपर्टी कार्ड विषयात काम करायला सुरु केल्यानंतर अनेक विविध समस्यांची जाणीव झाली. या सोडविण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडे गावांच्या विकासासाठी पंचायत राजची संकल्पना जशी अंमलात आली. त्याचं पद्धतीने शहरातील सोसायट्यांमधील रहिवासी कुटुंबांची संख्या लक्षात घेऊन, त्या सोडविण्यासाठी काम करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

खा. गिरीश बापट म्हणाले की, पानशेतच्या पूरानंतर पुण्याचं स्वरुप बदलले. वाडा संस्कृतीची जागा फ्लॅट संस्कृतीने घेतली. त्याअनुषंगाने मूलभूत सुविधांसाठी सोसायट्यांची गरज अधोरेखित झाली. अन् हे महत्व ओळखूनच पुण्यात गृहनिर्माण सोसायट्या अस्तित्वात आल्या. या सोसायट्यांचे वातावरण चांगले राहण्यासाठी, त्यांच्या समस्या वेळीच सोडविल्या पाहिजेत.‌असे त्यांनी यावेळी सांगितले.

कोथरुड मधील सोसायटीतील नागरिकांचे विधी विषयक प्रश्न सोडविण्यासाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती अॅड.‌मिताली सावळेकर यांनी दिली. कार्यक्रमाचे स्वागतपर प्रास्ताविक कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. संदीप बुटाला यांनी केले‌. अॅड. मोहना नातू यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास कोथरूड मधील २२५ सोसायटीचे अध्यक्ष सचिव उपस्थित होते. यावेळी सोसायटी आणि अपार्टमेंट मधील कायदेविषयक समस्या सोडविण्यासाठीच्या मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: