Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘नाद केला ना, बाद करीन’ ‘इर्सल’च्या दमदार टीझरची सोशल मिडियावर हवा    

”या दांडेकर पूलाला ना एक शाप हाय, इथला भाय कोणच नाय.. इथं कोण भाई बनायला गेलं ना की दोन – चार जन मिळून त्याचा इषयच करतात. आपल्या शब्दाच्या बाहेर दांडेकर पूल नाही” अशा दमदार डायलॉग ने ओपन होणाऱ्या ‘इर्सल’ या आगामी मराठी चित्रपटाच्या टीझर ची सध्या सोशल मिडियावर जोरदार हवा निर्माण झाली आहे.  भलरी प्रॉडक्शन्स निर्मित, राज फिल्म्स प्रस्तुत ”इर्सल’ चित्रपटाचे दिग्दर्शन अनिकेत बोंद्रे व विश्वास सुतार यांनी केले आहे.

‘राजकारणात गुलालाशिवाय मज्याच नाय!!’ टॅगलाईन असलेल्या ‘इर्सल’ ने फर्स्ट लुक पासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘इर्सल’ च्या टीझर मधून हा एक पॉलिटिकल थ्रीलरपट असल्याचे दिसते.  उंच इमारती, झोपडपट्टी, कबुतरांची ढाबळ , शहरात भर रस्त्यात होणाऱ्या हाणामाऱ्या आणि त्याला असलेली राजकारणाची जोड  यामुळे चित्रपटाच्या कथे बद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे. 

‘इर्सल’ बद्दल बोलताना दिग्दर्शक अनिकेत बोंद्रे व विश्वास सुतार म्हणाले, आतापर्यंत राजकारणावर अनेक चित्रपट, नाटकं आली. बर्‍याचदा त्यातील मांडणी खूप वरच्या स्तरातील असते. ‘इर्सल’ हा सिनेमा एकदम खालच्या फळीतील राजकारण आणि त्यातून प्रत्यक्ष घडणार्‍या घटनांमागील घटनांचा पर्दाफाश करतो. प्रत्येकजण आपापल्या वकुबानुसार जाणूनबुजून किंवा अप्रत्यक्ष या षडयंत्रात कसा गोवला जातो? ते ‘इर्सल’च्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोचवणे, हेच या सिनेमाचं वेगळेपण आहे.

‘इर्सल’चे निर्माते विनायक आनंदराव माने आहेत. ‘इर्सल’ चित्रपटातून विक्रम सूर्यकांत आणि शिवानी मोझे पाटील ही फ्रेश जोडी पदार्पण करत आहे. चित्रपटात डॉ. मोहन आगाशे, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुजाता मोगल, अभिनेत्री माधुरी पवार, शरद जाधव, अजिंक्य निकम, विश्वास सुतार, संजय मोहिते, आदर्श गायकवाड, दिग्विजय कालेकर, सुधीर फडतरे, ओंकार भस्मे, केतन विसाळ, हर्षाली रोडगे, नागेश नाईक, आकाश भिकुले, वैशाली घोरपडे, चैताली बर्डे, अप्पासाहेब कुंडले, सर्जेराव जाधव, हनिफ शेख या कलाकारांच्या भूमिका आहेत.

‘इर्सल’ चित्रपटाला ‘नाद करायचा नाय’ फेम संगीतकार दिनकर शिर्के ‘इर्सल’चे गीत – संगीतकार आहेत. तर नृत्य दिग्दर्शक धैर्यशील उत्तेकर आहेत. कथा अनिकेत बोंद्रे यांची असून, पटकथा अनिकेत बोंद्रे व महेशकुमार मुंजाळे यांची, तर संवाद विश्वास सुतार यांचे आहेत. छायांकन आनंद पांडे व वीरधवल पाटील यांनी केले आहे. बहुचर्चित ‘इर्सल’ हा मराठी चित्रपट येत्या 3 जून 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading