बालकलाकारांनी ७४ सफाई कर्मचा-यांच्या आरोग्यविम्याकरीता दिले अभिनयाचे मानधन
पुणे : अभिनयाद्वारे मिळालेले मानधन सामाजिक कार्याला अर्पण करीत पुण्यातील बालकलाकार श्रीश (१३ वर्ष) व दर्श (१० वर्ष) खेडेकर यांनी वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय व आजूबाजूच्या परिसरातील ७४ सफाई कर्मचा-यांचा दोन वर्षांसाठी एक लाखाचा आरोग्य विमा दिला आहे. लघुपट, नाट्यक्षेत्र आणि छोटया पडद्यावरील हे कलाकार विविध नैसर्गिक आपत्तींमध्ये देखील गरजूंना सातत्याने मदत करतात.
वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय येथे आरोग्य विमा प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम पार पडला. पद्मश्री प्रसाद सावकार यांनी बालकलाकारांचा गौरव केला. दोन्ही बालकलाकारांची आई मनीषा खेडेकर, वडिल डॉ. राजेंद्र खेडेकर, क्षेत्रीय कार्यालय मुकादम अंकुश साठे, विमा वितरणाच्या वेळी दोन्ही बालकलाकारांची आई मनीषा खेडेकर, वडिल डॉ. राजेंद्र खेडेकर, क्षेत्रीय कार्यालय मुकादम अंकुश साठे, ओरिएंटल इन्शुरन्सच्या वरिष्ठ मंडल प्रबंधक सुनिता भुरेवार, सामाजिक कार्यकर्ते विकास माने, जयवंत मिसाळ, अजय घोडे, गणेश आवळे, मंदार शेंडे, सचिन सोनवणे, समीर खांबे, संतोष वरक, आनंद लोंढे आदी उपस्थित होते.
आपल्या आईचा वाढदिवस व नुकताच झालेला मातृदिन यानिमित्ताने हा उपक्रम या बालकलाकारांनी राबविला आहे. यापूर्वीही त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी, पूरग्रस्त बांधवांसाठी, कोविड काळात अन्नदान करणा-या संस्थांसाठी, कोविडमुळे झालेल्या चार बालकांचा शैक्षणिक खर्च, तसेच डॉल्फिन इंग्लिश मिडीयम स्कूलसह इतर काही ठिकाणी वंचितांसाठी अन्नदानासाठी आपल्याला आलेले संपूर्ण मानधन म्हणजे आजपर्यंत अडीच लाख रुपये दान केलेले आहे. श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टच्या रुग्णवाहिकेला १८ हजार रुपयांचा बार लाईट हॉर्न स्पिकर देखील भेट देण्यात आला.
श्रीश खेडेकर म्हणाला, पूर्वजांची पुण्याई व आई-वडिलांचे आशीर्वाद यामुळे आम्हाला चांगल्या शाळेत शिक्षण व एवढ्या लहान वयात अभिनय करून मानधन मिळत आहे. हेच मानधन सामाजिक वारसा जपत वंचितांसाठी खर्च होणे आवश्यक आहे. वंचितांची सेवा हेच साधू संतांची शिकवण आहे. गेल्यावर्षी कोविडच्या काळात याच वेळी माज्या वडिलांचा फोन वारंवार कोणाला हॉस्पिटल इंजेक्शन औषधे आॅक्सिजन पाहिजे किंवा कमी करून पाहिजे यासाठी वाजत होता. या काळात विमा किती आवश्यक गोष्ट आहे हे समजले.
