Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRA

मान्सूनपूर्व कामे गतीने करा; आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदतीसाठी तत्पर रहा – विजय वडेट्टीवार

कोकण व पुणे महसूली विभागाच्या मान्सूनपुर्व बैठकीत दिले निर्देश

मुंबई : सर्व प्रशासकीय यंत्रणांनी मान्सूनपूर्व कामे गतीने करावीत. त्याचबरोबर अचानक येणारी वादळे व पूर यामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी, या आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना तात्काळ मदत व पुनर्वसन करण्यासाठी राज्यात आपत्ती प्रतिसाद यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात येणार असून याचे सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांना प्रशिक्षण द्यावे, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

आज कोकण व पुणे महसूली विभागातील जिल्ह्यांची मान्सूनपूर्व आढावा बैठक दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून झाली. यावेळी मंत्रालयातील कक्षातून आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री श्री. वडेट्टीवार बोलत होते. या बैठकीला मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, आपत्ती व्यवस्थापन संचालक संजय धारूरकर यांच्यासह दूरदृश्यप्रणालीव्दारे कोकण विभागीय उपायुक्त मकरंद देशपांडे, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी, ठाणेचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी पी.बी.पाटील, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव,कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, मुंबई महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नारळीकर, पालघरचे जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, पालघरचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण महाजन, सांगलीच्या अप्पर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख, पुण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, साताराचे निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) मुधोळकर तसेच दोन्ही विभागातील जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी उपस्थित होते.

वडेट्टीवार म्हणाले, आपत्ती कालावधीत शून्य मृत्यूदर हे शासनाचे ध्येय असून, आपत्ती प्रतिसाद यंत्रणा (Incidence Response System) ही राज्यात लागू करण्यात येत आहे.आपत्तीत प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणामध्ये योग्य तो समन्वय राहावा यासाठी ही यंत्रणा काम करणार आहे.त्यामुळे या यंत्रणेसाठी लागणारे प्रशिक्षण व इतर माहिती जिल्हांना तात्काळ पुरवावी अशा सूचना यावेळी वडेट्टीवार यांनी बैठकीत दिल्या.

वडेट्टीवार म्हणाले की, गेल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणात पावसामुळे आपत्तीला तोंड देत आहोत. यंदाच्या वर्षीही सरासरीपेक्षा जास्त व वेळेपूर्वी पाऊस येणार असल्याचा अंदाज आहे. हा अंदाज पाहून त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात आपत्ती निवारणाची कामे करण्यात यावीत. अचानक येणारे पूर, दरडी कोसळणे आदी आपत्तीला तोंड देण्यासाठी स्थानिक ठिकाणची प्रशासकीय यंत्रणा गतीमान असली पाहिजे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पूर व अतिवृष्टीमुळे पाणी साठू नये यासाठी ज्या क्षेत्रात नागरीकरण मोठ्या प्रमाणात आहे, तेथे पावसाळ्यापूर्वीची नाले सफाईची, धोकादायक वृक्ष तोडणे अथवा फांद्या तोडणे, रस्ते दुरुस्ती, बांधकामाचे कामे पूर्ण करावीत. यंदाही पाऊस लवकर सुरू होणार आहे, हे लक्षात घेता सर्व यंत्रणांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आपली आपत्ती यंत्रणा बळकट करावी. विशेषत: मुंबई प्रशासनाचा रेल्वे प्रशासनाशी समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, कोल्हापूर, सातारा व सांगली या भागात वाढता पुराचा धोका लक्षात घेता राज्य आपत्ती प्रतिसाद दल व राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची टीम कायमस्वरूपी या भागात राहण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. आपत्ती कालावधीत मदत करणाऱ्या साहसी टीमची नियुक्ती करून त्यांचे दूरध्वनी क्रमांक अद्यावत करावेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने स्थानिक मागणीनुसार अद्यावत वाहने अथवा साहित्य मागणीसाठी प्रस्ताव सादर करावेत.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading